भाजप-शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा कायम असताना भाजप नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा मात्र वाढीस लागलेली आहे. ‘नरेंद्रांच्या वाटेवरुन देवेंद्रांची’ वाटचाल सुरु असून विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही आपली छबी ठसविण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. सरकारचे नेतृत्व करण्यास आपण सक्षम असल्याचे सांगून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत उडी घेतली आहे. सुधीर मुनगंटीवार हेही या पदासाठी इच्छुक असल्याचे सांगत नसले तरी  पक्ष देईल, ती जबाबदारी पार पाडू, असा सूर आळवीत आहेत. या चौघांमध्ये बिघाडी झाली, तर त्यांच्यावर कडी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी थेट केंद्रातून ‘हनुमान उडी’ ही घेण्याच्या तयारीत आहेत, अशीही चर्चा आहे.
महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत भाजप नेतृत्वाखाली सरकार आणण्याचे प्रयत्न करण्याच्या सूचना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्या आहेत. त्यामुळे जागावाटप होत नसले तरी सर्व २८८ मतदारसंघात भाजपची तयारी सुरु आहे. भाजपकडे मुख्यमंत्रीपद आले, तर त्यासाठी नेत्यांचीही तयारी सुरु आहे.
 ‘दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र’ अशा घोषणा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हेही मोदींप्रमाणेच काही बाबतीत पावले टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. उद्योगसमूहांच्या विविध फेडरेशन किंवा संस्थामध्ये ते आवर्जून हजेरी लावत आहेत. पुण्यात फर्गसन महाविद्यालयात तरुणांशी संवाद साधून त्यांचे ‘व्हिजन’ समजावून घेत विकासाची दिशा ठरविण्यासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे. धनगर आरक्षण व अन्य प्रश्नांबरोबरच विदर्भाबरोबरच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी ते आता सभा-मेळावे घेत फिरत आहेत.
विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही नियोजनबध्द आघाडी उघडली असून त्यांच्या वेबसाईटसह सोशल मीडीयावरील जाहिराती व अन्य माध्यमांमधून छबी उजळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मराठा, धनगर यासह विविध समाजघटकांना जोडत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व राज्यातील अनेक भागात ते दौरे करीत आहेत. तब्येतीच्या कारणावरुन या स्पर्धेत काहीसे मागे असलेले  विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही शड्डू ठोकले असून आपण सरकारचे नेतृत्वही करु शकतो, असे सांगितले आहे. जाहिरात संस्थेच्या मार्फतही खडसे यांच्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. मुनगंटीवार यांनी थोडे अलिप्त राहून विदर्भात लक्ष केंद्रित केले आहे. तरी तेही स्पर्धेत उतरण्याची शक्यता आहे. हे चौघेही नेते पक्ष देईल, ती जबाबदारी पार पाडण्यास तयार असल्याचे सांगत आहेत.
मात्र पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला या नेत्यांऐवजी गडकरी यांना महाराष्ट्रात पाठविण्याची इच्छा असल्यास अन्य नेत्यांच्या आकांक्षावर पाणी पडणार आहे. आपल्याला महाराष्ट्रात अजिबात रस नसल्याचे गडकरी सांगत असले, तरी मुख्यमंत्रीपद आणि अनुकूल परिस्थिती असल्यास तेही महाराष्ट्रात उडी घेण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे समजते.