भाजपचे निवडणूक प्रभारी ओमप्रकाश माथूर रविवारी मुंबईत दाखल झाले असून आता त्यांचा मुक्काम निवडणुका पार पडेपर्यंत मुंबईतच राहणार आहे. पुढील दोन-चार दिवसांत ते निवडणूक तयारीचा आढावा घेणार असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांचे विश्वासू असलेले खासदार ओमप्रकाश माथूर यांची निवडणुकीसाठी प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी माथूर रविवारी मुंबईत आले. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राज पुरोहित, अतुल शहा आदी नेते व कार्यकर्ते यांनी ढोलताशाच्या गजरात त्यांचे विमानतळावर स्वागत केले. शहा हे ४ सप्टेंबरला मुंबईत येत असून तोपर्यंत पक्षाच्या निवडणूक तयारीचा एक आढावा घेतला जाणार आहे. पक्षाच्या विविध यंत्रणांची तयारी कशी आहे, आतापर्यंत कोणती पावले उचलली, याविषयी ते माहिती घेतील.