भाजपला स्वबळावर प्रथमच आणि गेल्या १५ वर्षांनंतर राज्यात विरोधी पक्षाला सत्ता मिळाल्याने भाजपने जल्लोषाची जोरदार तयारी केली आहे. राज्यातून मोठय़ा उत्साहाने हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल होत असून शपथविधीचे पासेस मिळविण्यासाठी ते धडपड करीत आहेत. भाजप प्रदेश कार्यालय व मंत्रालय परिसरात कार्यकर्ते व त्यांच्या वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे.
प्रदेश कार्यालय ते विधानभवन व मंत्रालय परिसरात सर्वत्र भाजपचे झेंडे, बॅनर्स व पोस्टर्स लावण्यात आले आहेत. कार्यालयात रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत प्रदेश कार्यालयातील आणि एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्या बंगल्यांवरली कार्यकर्त्यांची गर्दी खूप वाढली आहे. मंत्रिमंडळात सहभागासाठी इच्छुक नेते, पदाधिकारी, त्यांचे समर्थक आणि राज्यातील कार्यकर्ते मोठय़ा उत्साहाने गेले दोन दिवस मुंबईत दाखल होत आहेत. ही गर्दी गुरुवारी तर बरीच वाढली आणि आता आमदार निवास, मंत्रालयासमोरील बंगल्यांची आवारे यासह मिळेल त्या जागेत त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. झोपण्यासाठी गाद्या, खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. शपथविधी तयारीच्या धामधुमीत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या ६५ व्या जयंतीचा कार्यक्रमही प्रदेश कार्यालयात सायंकाळी झाला. सरचिटणीस रवींद्र भुसारी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी महाजन यांना आदरांजली वाहिली.
पासेससाठी धडपड
शपथविधी समारंभासाठी व्हीआयपी पास मिळविण्याकरिता हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते धडपडत होते. शासकीय यंत्रणेकडून सायंकाळी उशिरापर्यंत हे पास मिळालेले नव्हते. त्यामुळे प्रदेश कार्यालयातील पदाधिकारी अस्वस्थ झाले होते.