हरयाणा व महाराष्ट्रापाठोपाठ भारतीय जनता पक्षाने दिल्लीतही सत्तास्थापनेची तयारी केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर भाजपला विजय मिळाला असला तरी राष्ट्रपती राजवट असलेल्या दिल्लीत मात्र भाजप नेते निवडणूक घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. दिल्लीत आम आदमी पक्षाचा प्रभाव ओसरला नसल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळण्याची आशा नाही. त्यामुळे उपराज्यपाल नजीब जंग यांच्या निमंत्रणाची वाट पाहणचे स्थानिक भाजप नेत्यांनी ठरवले आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत सत्तास्थापनेचा तिढा लवकर सोडवण्याची सूचना उपराज्यपाल व केंद्र सरकारला केली होती. उपराज्यपाल भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देणार होते. परंतु आम आदमी पक्षाच्या दबावापोटी उपराज्यपालांनी सर्वच राजकीय पक्षांना गुरुवारी सत्तास्थापनेवर चर्चेसाठी बोलविले आहे.
आम आदमी पक्षाचा भाजपला विरोध आहे. भाजप तोडफोडीचे राजकारण करीत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. शिवाय गेल्या आठ महिन्यांपासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे नव्याने निवडणूक घेण्याची मागणी आम आदमी पक्ष करीत आहे. भाजपकडे सध्या २९ जागा आहेत. तीन जागा भाजपचे आमदार लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने रिक्त आहेत. या जागांसाठी २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या तीनही जागा जिंकल्या तरीदेखील बहुमतासाठी भाजपला तीन जागांची गरज आहे. अशा परिस्थितीत अल्पमतातील सरकार स्थापून अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याची भाजपची योजना आहे. काँग्रेसच्या आठपैकी चार तर आम आदमी पक्षाचे बंडखोर आमदार विनोदकुमार बिन्नी सभागृहात ऐनवेळी अनुपस्थित राहिल्यास भाजपला बहुमत सिद्ध करता येईल. परंतु काँग्रेसच्या चार उमेदवारांनी अद्याप यासंबंधी निश्चिती केली नसल्याने भाजपला अल्पमतातील सरकार गडगडण्याची भीती असल्याचे दिल्लीस्थित भाजपच्या बडय़ा नेत्याने सांगितले. आम आदमी पक्ष नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या दबावामुळे दिल्लीत निवडणूक घेण्याचो टाळले जात असल्याचा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला आहे.