विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन शिवसेना व भाजप यांच्यातील संघर्षांची खदखद लोकसभा निवडणुकीआधीच सुरु झाली आहे. दिल्लीतून महाराष्ट्रात येणाऱ्या भाजप नेत्यांच्या दौऱ्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीचा एक अटळ कार्यक्रम असायचा. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर आता या नेत्यांना  मातोश्रीवर निमंत्रण का द्यावे लागते? लोकसभा निवडणुकीत पूर्वीचेच जागावाटपाचे सूत्र राहिले, मग विधानसभेच्या निवडणुकीत जास्त जागा का मागितल्या जात आहेत? भाजपविरोधातील नाराजीची ही काही ठळक कारणे आहेत, अशी महायुतीच्या वर्तुळात चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच महाराष्ट्रातील प्रचाराची रणनीती ठरवताना विशिष्ट पक्षाबद्दल मवाळ भूमिका घेण्यासंबंधी जी चर्चा झाली, त्यामुळे सेनेच्या वर्तुळात सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात आले. मग भाषणेही तुम्हीच लिहून द्या, असे एका सेना नेत्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्याला ऐकवल्याचे सांगितले जाते.
लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आणि त्यानंतर भाजपकडून शिवसेनेला गृहित धरण्यात येऊ लागले. वाजपेयी सरकारमध्ये सेनेला दोन मंत्रीपदे देण्यात आली होती, शिवाय लोकसभेचे सभापतीपदही सेनेला मिळाले होते. परंतु या वेळी फक्त एकच मंत्रीपद देण्यात आले, त्यातही अनंत गिते यांचे  अवजड उद्योग खाते चर्चा न करताच परस्पर जाहीर करण्यात आले, ही सल सेना नेतृत्वाच्या मनात आहे.
युती अस्तित्वात आल्यानंतर प्रत्येक वेळी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज, मुरली मनोहर जोशी, व्यंकय्या नायडू आदी दिल्लीच्या महत्त्वाच्या नेत्यांचा महाराष्ट्राचा दौरा असला की, मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांची भेट घेणे हा एक त्यातील अटळ कार्यक्रम असायचा. मात्र, लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना ‘निमंत्रण देण्याची’ गरज निर्माण झाली. याबाबतही शिवसेनेच्या नेत्यांत नाराजी आहे.