पाच राज्यातील पोटनिवडणुकांच्या निकालाने काँग्रेस व राष्ट्रवादीमधील मरगळ दूर झाली असून, त्याचा प्रत्यय राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंगळवारी आला. मुलाखती देताना इच्छुकांचा उत्साह वाढला होता. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडय़ातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी इच्छुकांची मते जाणून घेतली. पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये १५ ते २० जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केल्याने पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढणार आहे. पुणे जिल्ह्यातील एका इच्छुकाने, ‘साहेब १९७२ पासून आपल्याबरोबर आहे. यंदा तरी विचार करा’, अशी विनंती केली. तर ‘१९९५ पासून आपल्या सल्ल्यानुसार थांबत आलो आहे, आणखी किती काळ थांबायचे’, असा प्रश्न एका इच्छुकाला पडला. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे पक्ष संघटनेत फारसे सहभागी होत नाहीत. पण सातारा जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखतींच्या वेळी ते उपस्थित राहिले. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, आर. आर. पाटील, जयंत पाटील आदी नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये कोणी अर्जच दाखल केलेला नाही. एका इच्छुकाने उमेदवारी मिळणार नाही याची पूर्ण कल्पना असताना पाच हजार रुपये पक्षाला मदत म्हणून दिल्याचा दावा केला.