विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने बऱ्यापैकी आघाडीचा धर्म  पाळण्याचा प्रयत्न केला असला तरी काही ठिकाणी उलट-सुलट राजकीय समीकरणे झाली आहेत.
उस्मनाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने अध्यक्षपद कायम ठेवले. गेल्या वेळीही काँग्रेस-शिवसेना युती होती. स्थानिक पातळीवर दोन्ही काँग्रेसमध्ये असलेल्या कमालीच्या वादातूनच उभय पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत. शिवसेनेशी हातमिळवणी करून काँग्रेसने चुकीचा संदेश दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.  रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शेकाप हे दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी पक्ष एकत्र आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच शेकापबरोबर पडद्याआडून मैत्री केली होती. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोघे एकत्र आले. विधानसभेतही हाच कल कायम राहण्याची शक्यता आहे.
नगर आणि कोल्हापूर या दोन राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही काँग्रेस एकत्र आले. अमरावतीमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीचे बंडखोर नेते संजय खोडके यांच्या मदतीने अध्यक्षपद पटकावले. वर्धा जिल्ह्या परिषदेत दत्ता मेघे भाजपात गेल्याने काही सदस्य त्यांच्या बरोबर गेले. परिणामी काँग्रेसला अध्यक्षपद गमवावे लागले. यवतमाळमध्ये गेल्या वेळी राष्ट्रवादीने भाजप-शिवसेनेच्या मदतीने अध्यक्षपद मिळविले होते. यंदा काँग्रेसने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. नाशिकमध्ये काँग्रेसला ऐनवेळी हात दाखवत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही पदे स्वत:च्या खिशात घालण्यात यश मिळविले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला.नांदेड जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षनेत्यांकडून झालेल्या पक्षपातीपणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ सदस्यांनी  पदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे दिले.