आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम असताना राष्ट्रवादीने सर्व २८८ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या म्हणून आधी फक्त १७४ मतदारसंघांच्या मुलाखती घेणाऱ्या काँग्रेसने ‘जशास तसे’ म्हणून राष्ट्रवादीच्या ताब्यातील ११४ मतदारसंघांतील इच्छुकांच्याही येत्या रविवारी मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे याचा मुलाखती असा उल्लेख न करता चर्चेसाठी निमंत्रण असे नाव देण्यात आले आहे. मात्र पक्षाचा हा निर्णय म्हणजे वरातीमागून घोडे असाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये उमटली आहे.
आघाडी तुटल्यास शेवटच्या क्षणी धावपळ नको म्हणून राष्ट्रवादीने सर्व २८८ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
इच्छुकांच्या मुलाखती घेताना राष्ट्रवादीच्या मतदारसंघांतील मुलाखती काँग्रेसने टाळल्या होत्या. आघाडीचा धर्म म्हणूनच आम्ही हे मतदारसंघ सोडले होते. पण राष्ट्रवादीने सर्व मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याने आम्हीही केंद्रीय नेत्यांच्या परवानगीने सर्व मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. काँग्रेसच्या या निर्णयाबद्दल पक्षाच्या काही नेत्यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी कुरापत काढणार हे स्पष्ट असताना सर्व २८८ मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी कोणी हात धरले होते, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या एका नेत्याने व्यक्त केली.