गतवेळच्या तुलनेत जादा जागा मिळाव्यात म्हणून राष्ट्रवादीने दिलेल्या प्रस्तावावर काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वाने अद्याप काहीच प्रतिसाद दिलेला नाही. जागावाटपावरून ‘जैसे थे’ परिस्थिती कायम असताना भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाचे काय होते हे बघूनच आघाडीचा निर्णय होईल, अशी गुगलीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी टाकली.
राष्ट्रवादीने जास्त जागांची मागणी करणारा प्रस्ताव तीन आठवडय़ांपूर्वी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला होता. पण काँग्रेसकडून अद्याप काहीच प्रतिसाद दिलेला नाही, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. काँग्रेसकडून काहीच संपर्क झालेला नसल्याने आघाडीबाबत सध्या तरी काहीच मतप्रदर्शन करता येणार नाही. मात्र आघाडी कायम राहावी ही राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे पटेल यांनी सांगितले.
आघाडी कायम राहावी ही काँग्रेसची भूमिका आहे. पण राष्ट्रवादीची इच्छा नसल्यास काँग्रेसची स्वबळावर सर्व जागा लढण्याची तयारी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. आघाडी व्हावी हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. सध्या या संदर्भात चर्चा सुरू आहे. लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीची शनिवारी सुरुवात
काँग्रेसने प्रचाराचे रणशिंग सोमवारी फुंकले असतानाच राष्ट्रवादीच्या वतीने शनिवारी मुंबईत प्रचाराची सुरुवात करण्यात येणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम होणार असून, तत्पूर्वी पक्षाच्या विविध फंटच्या वतीने शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.