जिल्ह्य़ात आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वच ठिकाणी उमेदवारांची भाऊगर्दी असली, तरी खरी लढत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातच आहे. आघाडी आणि युतीच्या फाटाफुटीनंतर जिल्ह्य़ाचे राजकारण नव्या वळणावर असून, या वेळी खऱ्या अर्थाने कोण किती पाण्यात आहे हे स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीने मिळविलेले मताधिक्य दोन्ही काँग्रेसला आत्मपरीक्षण करायला लावणारे ठरले. निवडून येण्याबरोबरच पुढील राजकीय सोयीसाठी पाडापाडीचे राजकारण नेत्यांकडून झाले तर नवल नाही.
खानापूर
येथे काँग्रेसचे विद्यमान आमदार सदाशिवराव पाटील यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. काही मतदारसंघांत उमेदवारीसाठी धावाधाव करावी लागणाऱ्या राष्ट्रवादीला येथे अमरसिंह देशमुख हे आयते उमेदवार लाभले आहेत. आटपाडीतील गोपीचंद पडळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. शिवसेनेत गेलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बाबर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.
तासगाव-कवठे महांकाळ
राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असणाऱ्या आर. आर. पाटील यांचा हा मतदारसंघ. त्यांचे कट्टर विरोधक असणारे खा. संजयकाका यांनी येथील निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने आबांची कसोटी लागणार आहे. आबांना घेरण्यासाठी भाजपाने राष्ट्रवादीतून आयात केलेल्या अजित घोरपडे यांना मदानात उतरविले असून, काँग्रेसनेही सुरेश शेंडगे यांना उमेदवारी दिली आहे.
पलूस-कडेगाव
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असणारे डॉ. पतंगराव कदम यांचा हा मतदार संघ. त्यांना विरोध करण्यासाठी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी पृथ्वीराज देशमुख या वेळी भाजपची उमेदवारी घेऊन मदानात उतरले आहेत. याशिवाय ऐन वेळी उमेदवारी देऊन श्रमिक मुक्ती दलाचे मोहन यादव यांना राष्ट्रवादीने उभे केले आहे. या ठिकाणी खरी लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यातच होणार आहे.
सांगली
सांगलीकडे राज्याचे लक्ष असल्याने येथील निवडणूक अटीतटीची होणार आहे. भाजपने संभाजी पवार यांना डावलून सराफ व्यावसायिक सुधीर गाडगीळ यांना दिलेली उमेदवारी, शिवसेनेने पृथ्वीराज पवार यांना दिलेली उमेदवारी आणि काँग्रेसने मदन पाटील यांनाच पुन्हा एकदा दिलेली उमेदवारीची संधी या घटना लक्षवेधक आहेत.
भाजपला हा गड राखण्यासाठी यापूर्वी झालेली विरोधकांची मदत यंदा होणार नसल्याने विजयासाठी धावाधाव करण्याची वेळ येणार आहे.
मिरज
मिरज मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार सुरेश खाडे यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने अपरिचित प्रा. सिद्धार्थ जाधव यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसकडून आयत्या वेळी आयात केलेल्या बाळासाहेब व्होनमोरे यांना उमेदवारी दिली. शिवसेनेने तानाजी सातपुते यांना मदानात उतरविले आहे. सी. आर. सांगलीकर यांची बंडखोरी काँग्रेसला तापदायक ठरू शकते.
शिराळा
शिराळ्यातील नागाची आणि वाळव्याच्या वाघाची लढत या वेळी पाहण्यास मिळणार नसली, तरी राष्ट्रवादीच्या हक्काच्या जागेसाठी झुंज द्यावी लागणार आहे. शिवाजीराव नाईक हे भाजपचे आणि राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांच्यात होऊ घातलेल्या दुरंगी लढतीत आता काँग्रेसचे सत्यजित देशमुख िरगणात उतरले असल्याने येथील लढत लक्षवेधी ठरणार आहे. वाळव्याचे जयंत पाटील आता राष्ट्रवादीचा धर्म पाळणार, की साडू असणाऱ्या सत्यजित देशमुख यांना हात देणार हे महत्त्वाचे.
इस्लामपूर
इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे आपले वर्चस्व राखण्याबरोबरच जास्तीत जास्त मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्नशील असले तरी याठिकाणी काँग्रेसने जितेंद्र पाटील यांना मदानात उतरवून एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न अखेपर्यंत केला. नानासाहेब महाडिक येथे अपक्ष म्हणून मदानात उतरले असून, शिवसेनेचे उमेदवार भीमराव माने आहेत. विरोधकांना एकत्र करण्याचे काँग्रेसच्या प्रतीक पाटील यांचे प्रयत्न असफल ठरल्याने इतर मतदार संघामध्ये लक्ष घालण्यासाठी जयंत पाटील यांना अवधी मिळेल.
जत
भाजपच्या उमेदवारीवरून चच्रेत राहिलेला हा मतदारसंघ. आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत किंगमेकर म्हणून वावरणाऱ्या विलासराव जगताप यांना उमेदवारी दिल्याने संतप्त झालेल्या प्रकाश शेंडगे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेत आव्हान उभे केले आहे. काँग्रेसतर्फे विक्रमसिंह सावंत, सेनेच्या वतीने संगमेश्वर तेली हे मदानात उतरले आहेत. या अवाढव्य मतदारसंघामध्ये सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे हीच कसोटी ठरणार आहे.