जातीयवादी शक्तींचा पराभव या परवलीच्या घोषणा देत रिपब्लिकन गटांना बरोबर घेऊन दलितांची एकगट्टा मते मिळवणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीकडून या वेळी पहिल्यांदाच रिपब्लिकन राजकारण बेदखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीशी काडीमोड घेऊन शिवसेना-भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचीही महायुतीत फरफट झाली आहे. महायुतीकडून दोन अंकी जागा मिळणे मुश्किल झाले आहे, तर मग सत्तेत सहभाग किती मिळणार, असा सवाल आठवले यांच्या कार्यकर्ते करू लागले आहेत.
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने १९९० मध्ये पहिल्यांदाच विधानसभेत जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला धक्का दिला. त्यावेळी रामदास आठवले यांना बरोबर घेतल्याने आणि जातीयवादी शक्तीचा पराभव करणे, असा दलितांमध्ये प्रचार केल्याने काँग्रेसला कशीबशी सत्ता वाचविता आली. त्यानंतर १९९५ ला आठवले गटाला काँग्रेसने बरोबर घेतले, परंतु त्यावेळी राज्यात सत्ता परिवर्तन झाले व शिवसेना-भाजपचे सरकार आले. १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली. त्यावेळी आठवले राष्ट्रवादीबरोबर राहिले, तर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबर समजोता केला. दोन्ही काँग्रेसकडे दलितांची मते वळल्याने निवडणुकीनंतर लहान पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्याची सत्ता पुन्हा मिळवणे शक्य झाले.
मागील २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आठवले यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेऊन रिडालोसच्या नावाने स्वतंत्र निवडणुका लढविल्या, तरी दोन्ही काँग्रेससोबत काही लहान रिपब्लिकन गट होते. या वेळी आठवले महायुतीसोबत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलोरेचा नारा दिला आहे. आनंदराज आंबेडकर यांनी संविधान मोर्चा स्थापन करुन आघाडी व महायुतीच्या विरोधात निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. केवळ विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यामुळे प्रा. जोगेंद्र कवाडे काँग्रेसबरोबर आहेत. परंतु त्यांचा आता म्हणावा तसा प्रभाव राहिला नाही. महायुतीत आठवले यांचीही फरपट होत आहे.