गेल्या अडीच दशकांपासून लोकसभेत शिवसेना आणि विधानसभेत बहुपक्षीय लोकप्रतिनिधी पाठवणाऱ्या अमरावतीच्या राजकारणात या वेळी फाटाफुटीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे. चार मतदारसंघात चौरंगी लढतीची चिन्हे आहेत. ‘मोदी लाट’ लोकसभेत पुन्हा शिवसेनेला संधी देण्यासाठी कारणीभूत ठरल्याने भाजप-सेनेत उत्साह संचारला होता, पण अंतर्गत कुरघोडीचे राजकारण, बंडखोरी आणि ‘आयाराम-गयाराम’मुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अपक्षांचे वाढते वर्चस्व खोडून काढण्याचे आव्हान काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि सेनेसमोरही आहे.
या मतदारसंघात काँग्रेसचे ३, अपक्ष २ आणि शिवसेनेचा १ आमदार आहे. लोकसभा निवडणुकीत मेळघाटचा अपवादवगळता उर्वरित पाचही मतदारसंघात महायुतीने आघाडी घेतली होती. मतदारांचा हा ‘कल’ कायम राहील का, याची साशंकता आहे. महायुती आणि आघाडीत फूट पडल्यानंतर पळापळ झाली. महापालिकेत आणि जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी बंडखोर खोडके गट, असे नवीन सत्तासमीकरण उदयास आले. त्याचा प्रभाव या निवडणुकीवर पडू शकतो. राष्ट्रवादीसाठी हा सर्वात प्रतिकूल काळ ठरला आहे.
बडनेरा
राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांना पराभूत करून अपक्ष रवी राणांनी राजकीय घोडदौड सुरू केली, पण लोकसभा निवडणुकीत त्यांचा उधळलेला वारू रोखला गेला. राष्ट्रवादीतर्फे लढणाऱ्या त्यांच्या पत्नीला बडनेरातून मताधिक्य मिळवून देण्यातही ते अपयशी ठरले. अलीकडच्या काळात अनेक स्थित्यंतरे झाली. खोडके राष्ट्रवादीतून बाहेर पडल्या तरी त्यांच्या गटाने महापालिकेवर वर्चस्व कायम ठेवले. आता काँग्रेसतर्फे सुलभा खोडके, राष्ट्रवादी समर्थित अपक्ष रवी राणा, शिवसेनेतर्फे संजय बंड व भाजपचे तुषार भारतीय यांच्यात लढत आहे.
दर्यापूर
दर्यापुरातून या वेळी शिवसेनेचे आमदार अभिजीत अडसूळ, रिपाइंचे (गवई गट) बळवंत वानखडे, काँग्रेसतर्फे नारायण राणे समर्थक सिद्धार्थ वानखडे, राष्ट्रवादीतर्फे दिनेश बूब, भाजपचे रमेश बुंदिले, भारिप-बमसंच्या उज्ज्वला आठवले, शेतकरी संघटनेचे विजय विल्हेकर, मनसेचे गोपाल चंदन, अशी उमेदवारांची गर्दी आहे. कुणबी-माळी मते निर्णायक ठरणारी आहेत.
अचलापूर
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या शिवसेना प्रवेशाने येथे राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे. काँग्रेसतर्फे अनिरुद्ध देशमुख, सेनेतर्फे सुरेखा ठाकरे, दोन वेळा निवडून आलेले अपक्ष बच्चू कडू, भाजपचे अशोक बन्सोड, राष्ट्रवादीतर्फे वसुधा देशमुख यांच्यात सामना होणार आहे. मुस्लीम आणि दलित मतांवर काँग्रेसचा डोळा आहे. माळी समाजाच्या मतांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. कुणबी मतांमध्ये विभाजन अटळ आहे. रिपाइंचे प्रताप अभ्यंकर यांच्या उमेदवारीचा कुणाला तोटा होऊ शकतो, याची चर्चा आहे.
मेळघाट
या आदिवासी मतदारसंघात गेल्या वेळी पराभूत झालेले भाजपचे राजकुमार पटेल लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीच्या संपर्कात आले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार केवलराम काळे यांच्यासमोर जागा राखण्याचे आव्हान आहे. भाजपचे प्रभुदास भिलावेकर, शिवसेनेचे मोतीलाल कास्देकर हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी पटेल आणि काळे यांच्यातच खरा सामना रंगणार आहे. गवळी आणि कोरकू समुदायातील मतांची विभागणी निर्णायक ठरत
आली आहे.
अमरावती
गेल्या वेळी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत आणि काँग्रेसचे बंडखोर डॉ. सुनील देशमुख यांच्यातील लक्षवेधी आणि रंजक लढतीत शेखावतांनी बाजी मारली होती. यावेळीही दोघे आमने-सामने आले आहेत. डॉ. देशमुख यांच्या हाती मात्र या वेळी भाजपचा झेंडा आहे. दोन दिग्गजांमध्ये सेनेचे प्रदीप बाजड भवितव्य अजमावतील. अल्पसंख्याकांची मते या मतदारसंघात निर्णायक ठरू शकणार असल्याने काँग्रेसने त्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. डॉ. देशमुख आणि शेखावत हे तुल्यबळ उमेदवार आहेत. कुणबी आणि हिंदी भाषकांचा कल निर्णायक ठरेल.
तिवसा
काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर या मतदारसंघातून पुन्हा सज्ज असताना त्यांच्या भगिनी डॉ. संयोगिता निंबाळकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. शिवसेनेचे दिनेश वानखडे, भाजपच्या निवेदिता चौधरी, राष्ट्रवादीतर्फे साहेबराव तट्टे, मनसेतर्फे डॉ. आकाश वऱ्हाडे, प्रहारचे संजय देशमुख यांच्यासह अनेक जण लढतीत आहेत. कुणबीबहुल या मतदारसंघात मतांची विभागणी कशा पद्धतीने होते, यावरच जय-पराजयाचे गणित ठरणार आहे.