सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना दुर्बल घटकांसह समाजातील सर्व वर्गांना सवलती देत खुश करण्याचा प्रयत्न केला होता व त्याचा २००४च्या निवडणुकीत काँग्रेसला फायदाही झाला होता. हाच प्रयोग काँग्रेसने यंदाही केला आहे. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा बाजूला ठेवत शेतकरी, विद्यार्थी, अल्पसंख्यांकांना जास्तीत जास्त सवलती देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जाहिरनामा समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भाऐवजी विदर्भ वैधानिक विकास मंडळाला जादा अधिकार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सत्तेत असताना यातील अनेक आश्वासनांची पूर्तता करणे शक्य होते, पण यावर कोणत्याही नेत्याकडे उत्तर नव्हते.
ठळक आश्वासने

  • शेतकऱ्यांना सवलतीत पीक कर्ज, दहा तास कृषी पंप वीज
  • दुष्काळ निवारण कायमस्वरुपी निधी
  • इ. ९ वी उत्तीर्ण होणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट
  • मुलींना पदवीर्प्यत सारे शिक्षण मोफत
  • इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या मुलींना सहयोग शिष्यवृत्ती
  • मुंबईतील पाचही टोल नाके बंद करणार
  • मुंबई व ठाण्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी क्लस्टर योजना
  • धारावी विकास आणि बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना ५०० चौरस फुटांची सदनिका.
  • सर्व जिल्ह्यांमध्ये शासकीय महाविद्यालय सुरू करणे
  • इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, भटक्या आणि विमुक्त जमातीतीच्या वार्षिक तीन लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलांना शुल्क माफ.