प्रचाराच्या काळात  ‘हप्ता वसुली पक्ष’ किंवा ‘नॅचरली करप्ट पार्टी’ असा हल्ला भाजपने राष्ट्रवादीवर चढविला होता. याच राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापनेसाठी हातमिळवणी करणार का, असा सवाल काँग्रेसने भाजपला उद्देशून केला आहे. राष्ट्रवादी सत्तेविना राहू शकत नाही, असा टोमणाही मारला आहे.
सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला मदत करण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून आला होता, असा दावा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. पण काँग्रेसच्या वतीने असा कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाला काँग्रेसने यापूर्वी कधीही पाठिंबा दिलेला नाही वा भविष्यात देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते अजय माकन यांनी स्पष्ट केले. काही पक्ष सत्तेविना राहूच शकत नाही. त्यामुळेच त्यांचा सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावून काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे याकडेही माकन यांनी लक्ष वेधले आहे. यंदा विरोधात बसण्याचा राज्यातील जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे व प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रचाराच्या काळात परस्परांवर आरोप करणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये दोन दिवसांत अचानक एवढा बदल कसा झाला हे सुद्धा राज्यातील जनतेला समजले पाहिजे, असेही काँग्रेस म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसने आता आक्रमक होण्यावर भर दिला आहे. यातूनच राष्ट्रवादीच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
काँग्रेस विरोधातच बसणार
राज्यातील जनतेने दिलेला कौल मान्य करून विरोधात बसण्याचा निर्णय राज्यातील नेत्यांनी घेतला. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सत्ता स्थापनेत कोणत्याही समीकरणात सहभागी होऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसच्या पराभवाचे खापर बहुतांशी नेत्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर फोडले आहे.