शिवसेना-भाजपमधील जागावाटपाच्या चर्चेला अखेर बुधवारचा मुहूर्त मिळाला. पण जागावाटपच्या पूर्वीच्याच म्हणजे शिवसेना १७१ आणि भाजप ११७ या सूत्रावर शिवसेना ठाम असून भाजपने १४४ जागांची आग्रही मागणी शिवसेनेकडे केली आहे. घटकपक्षांना १६ जागा देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव असून लोकसभेप्रमाणेच दोन्ही पक्षांनी निम्म्या म्हणजे प्रत्येकी ८ जागा सोडाव्यात, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. दोन्ही पक्ष आपल्या भूमिकांवर ठाम असल्याने चर्चेला तोंड फुटले असले तरी कोणीही माघारीच्या तयारीत नसल्याने कोंडी कायम आहे.
उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यात बुधवारी रात्री उशिरा चर्चा झाली. जागावाटपाचे जुने सूत्र बदलून १४४ जागा भाजपने लढवाव्यात, असा प्रस्ताव फडणवीस यांनी दिला. तर ठाकरे हे जुन्या सूत्रावरच ठाम होते. घटक पक्षांपैकी रिपब्लिकन पक्ष व स्वाभिमान पक्षाला प्रत्येकी सहा आणि शिवसंग्राम व राष्ट्रीय समाज पक्षाला प्रत्येकी दोन अशा एकूण १६ जागा द्याव्यात, असा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. भाजप-शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत घटक पक्षांना ज्याप्रमाणे प्रत्येकी दोन जागा सोडल्या, त्याच पद्धतीने विधानसभेसाठी प्रत्येकी ८ जागा सोडण्यात याव्यात, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. शिवसेनेचा प्रस्ताव भाजपने मान्य केल्यास आठ जागा सोडल्यानंतर शिवसेना १६३ व भाजप १०९ जागा लढवेल. गुहागरची जागा भाजपला देण्याची शिवसेनेची तयारी आहे. पण त्या बदल्यात घाटकोपर(प.) किंवा मुंबईतील एक जागा अथवा रत्नागिरीची जागा द्यावी, अशी शिवसेनेची मागणी आहे.
भाजपने पूर्वीच्याच सूत्राला मान्यता दिली, तर युती टिकू शकेल. बिहारच्या पोटनिवडणुकीतून धडा मिळालेला असताना स्वबळावर जाण्याचा विचार करू नये, असे भाजपमधील काही नेत्यांना वाटत आहे. तर आधीच्याच जागा घेऊन व त्यापैकी आठ घटक पक्षाला देऊन निवडणूक लढायची असेल, तर तीन सर्वेक्षणे आणि महिनाभर शड्डू ठोकून गर्जना करण्यापेक्षा प्रचाराचा धडाका सुरू करायला हवा होता, असे काही भाजप नेत्यांना वाटते. चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नसले, तरी ठाकरे यांनी भाजपच्या प्रदेश नेत्यांशी बोलणी सुरू केली, हेच फलित असल्याचे सांगण्यात आले.