गेली १५ वर्षे महाराष्ट्रात कॉग्रेस-राष्ट्रवादी सरकारने सर्वसामान्य, महिला आणि दलित बांधवांवर फक्त अत्याचार केला. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी जनता असुरक्षित असून, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील हे माफिया राज गाडून टाका, असे आवाहन भाजपचे नेते विनोद तावडे यांनी बुधवारी उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील कनगरा येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये केले.
तावडे यांनी आज तुळजापूरमध्ये भवानी मातेचे दर्शन घेऊन विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ केला. तुळजापूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संजय निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कनगरा येथे तावडे यांची प्रचार सभा झाली. कनगरा येथे काही महिन्यांपूवी पोलिसांनी या गावातील गावक-यांच्या घरात घुसून दारुबंदीला पाठिंबा देणा-या पुरुष, महिलांना बेदम मारहाण केली होती. त्यावेळी तातडीने विनोद तावडे यांनी कनगरा गावाला भेट देऊन या विषयावर विधान परिषदेच्या सभागृहात आवाज उठविला होता. याची आठवण आपल्या भाषणात करुन देताना तावडे यांनी सांगितले की, गृहमंत्री आर. आर.पाटील यांच्या पोलिसांनी गावक-यावर अमानुष अत्याचार केले होते, पण या पोलिसांवर सरकारने अद्यापपर्यत कुठलीही कारवाई केली नाही, त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कनगरा गावातील गावक-यांनी राष्ट्रवादी-कॉंग्रेसला मतपेटीतून उत्तर द्यावे आणि धडा शिकवावा.
आघाडी सरकारने गेली १५ वर्षे राज्यातील शेतक-यांकडे नेहमीच दुर्लश केले, त्यामुळे हजारो शेतक-यांनी आत्महत्या केल्या. राज्यातील शेतकरी उदध्वस्त झाला, अशी टीकेची झोडही त्यांनी यावेळी उठविली. शेतक-यांचा भल्याचा आणि विकासाचा विचार फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करु शकतात, म्हणूनच त्यांनी पहिल्यांदा शेतक-यांसाठी सरकारी दूरचित्रवाहिनीची सुरुवात केली, असा बदल फक्त मोदी हेच करु शकतात, असे तावडे म्हणाले.