येत्या दोन दिवसांत राज्यात भारतीय जनता पक्षाचे अल्पमतातील सरकार सत्तेवर येणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील असे शनिवारच्या दिवसभरातील घटना-घडामोडींनंतर स्पष्ट झाले आहे. शिवसेनेची फक्त दोनच मंत्रिपदांवर बोळवण करण्याच्या भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भूमिकेमुळे येत्या २८ वा २९ तारखेला वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात शिवसेनेचा समावेश नसेल हे नक्की झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्री व राज्यातील भाजपचे निरीक्षक राजनाथ सिंह भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी उद्या, सोमवारी मुंबईत येणार असल्याचे सांगण्यात येते. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यात येणार आहे. ती माळ अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडणार आहे. फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास रा. स्व. संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत व सहकार्यवाह भैयाजी जोशी यांची भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी १० वाजता केंद्रीय दळवळणमंत्री नितीन गडकरी दुचाकी वाहनाने सुरक्षारक्षकाला सोबत घेऊन संघ मुख्यालयात आले. जवळपास दोन तास मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर फडणवीस यांच्या मार्गातील सर्व ‘चिमुककाटे’ दूर झाले असून, सत्तेच्या ऐरावतावर देवेंद्रच बसणार असल्याचे निश्चित झाले असल्याचे माहीतगार सूत्रांनी सांगितले.  
फडणवीस यांचे नवे सरकार अल्पमतातील असेल हेही आता स्पष्ट झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. गेल्या मंगळवारी शिवसेनेचे दूत म्हणून गेलेले खासदार अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांची भेट घेतली. त्या वेळी शिवसेनेला पाठिंब्याच्या बदल्यात केवळ दोनच मंत्रिपदे देण्यात येतील असे त्यांना सांगण्यात आले. त्या प्रस्तावावर शिवसेनेकडून उत्तर न आल्याने भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आता ‘शिवसेनेला यापुढे आपण सांगू त्याच अटी मान्य कराव्या लागतील’, असे धर्मेद्र प्रधान यांच्याशी झालेल्या चर्चेत सांगितले. त्यामुळेच सोमवारी राजनाथ सिंह आणि शिवसेनेचे नेते यांच्यात पाठिंब्याबाबत चर्चा संभवत असली तरी त्यातही शिवसेनेची दोनच मंत्रिपदांवर बोळवण करून ‘शाही’ कोंडी करण्यात येईल, अशी शक्यता भाजपच्या गोटातून वर्तविण्यात येते. शिवसेनेचे संख्याबळ ६१ असले तरी सरकार स्थापनेसाठी भाजपला आणखी केवळ २३ आमदारांची आवश्यकता आहे. हाच आकडा ग्राह्य़ धरून त्या तुलनेत मंत्रिपद देण्याची भाजपची भूमिका आहे. त्यापुढे शिवसेनेने लोटांगण न घातल्यास अल्पमतातील सरकार स्थापन करावे व चर्चेच्या झुल्यावर शिवसेनेला झुलवत ठेवावे या निर्णयाप्रत भाजप नेते आले असल्याचे सांगण्यात येते. गरज भासल्यास राष्ट्रवादीचा बाहेरून विनाशर्त पाठिंबा घेण्याचा पर्याय भाजपपुढे नेहमीच खुला आहे.

*फडणवीस यांच्या मार्गातील सर्व ‘चिमुककाटे’ दूर झाले असून, सत्तेच्या ऐरावतावर देवेंद्रच बसणार असल्याचे निश्चित झाले असल्याचे माहीतगार सूत्रांनी सांगितले.  
*सोमवारी राजनाथ सिंह आणि शिवसेनेचे नेते यांच्यात पाठिंब्याबाबत चर्चा संभवत असली तरी त्यातही शिवसेनेची दोनच मंत्रिपदांवर बोळवण करून ‘शाही’ कोंडी करण्यात येईल, अशी शक्यता आहे.