भाजपचे नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर भाजपचे केवळ सात मंत्रीच शपथ घेण्याची शक्यता असून घटकपक्ष व शिवसेना सदस्य यांच्यापैकी कोणीही शपथ घेणार नाही. घटकपक्ष आणि शिवसेनेचा प्रश्न सोडविण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने तो निर्णय झाल्यावर व विश्वासदर्शक ठराव पार पडल्यावर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी शुक्रवारी होत असून यावेळी भाजपचे सात मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. राज्य सुकाणू समितीतील फडणवीस यांच्याबरोबरच एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांच्याबरोबर अनुसूचित जातीतील सुधाकर भालेराव किंवा भाई गिरकर आणि अनुसूचित जमातीचे विष्णू सावरा यांचा समावेश मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात होण्याची चिन्हे आहेत. मंत्रिमंडळात कोणाची निवड करायची, याबाबतचा निर्णय अध्यक्ष अमित शहा यांच्या पातळीवर होत असून ते गुरुवारी मुंबईत ओम माथूर व फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय होईल. शपथ घेणाऱ्यांची संख्या वाढण्याची फारशी शक्यता नाही.

शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही, घटकपक्षांकडून ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा आहे, ते विधानसभेत आमदार नसल्याने त्यांना विधानपरिषदेवर कसे निवडून आणायचे की महामंडळांवर त्यांची वर्णी लावायची, याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर घेतला जाईल. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सूत्रांनी सांगितले.

शपथविधी झाल्यावर मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रालयात होईल. विशेष अधिवेशनाच्या तारखा ठरविणे आणि राज्यपालांच्या अभिभाषणाला मंजुरी देणे, हे विषय मंत्रिमंडळापुढे प्राधान्याने असतील. विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड यासाठी १०, ११ व १२ नोव्हेंबरला विशेष अधिवेशन बोलाविले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निमित्ताने संख्याबळ व सरकारचे बहुमत पणाला लागणार असल्याने त्याच वेळी विश्वासदर्शक ठरावालाही सामोरे जाण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित
सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसरकर, धनराज पिल्ले, युवराज वाल्मिकी, मीर रंजन नेगी, नरसिंग यादव, संदीप यादव, अंजली भागवत, लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन, आमीर खान, शाहरूख खान सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, हृतिक रोशन, अनिल अंबानी, मुकेश अंबानी, रतन टाटा, आनंद महिंद्रा, राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, भाजपशासित राज्यांमधील मुख्यमंत्री.