मध्यमवर्गीय आणि राजकीय पाश्र्वभूमी नसताना कार्पोरेट जगतात वावरणारी अमृता रानडे, देवेंद्र फडणवीसांची पत्नी म्हणून राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या फडणवीसांच्या घरात आली आणि कॉर्पोरेट जगतातले आपले स्थान सांभाळून देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय प्रवासात त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली. त्यांची ही सहचारिणी आता सौ. मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा ‘प्रत्येक स्त्रीने स्वत:ची ओळख जपायलाच हवी त्यामुळे कॉर्पोरेट जगतातील आपला प्रवास यापुढेही असाच सुरू राहणार असल्याचे’ त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
अलीकडच्या राजकारणात अशी उदाहरणे दुर्मीळ झालेली असताना अमृता रानडे-फडणवीस यांनी ‘स्व’ ओळख जपण्यासाठी उचललेले पाऊल राजकारणात असाही साधेपणा असू शकतो, हे दाखूवन देणारे ठरले आहे. नागपुरातील प्रसुतिरोगतज्ज्ञ डॉ. चारू रानडे आणि नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांची ही कन्या अ‍ॅक्सिस बँकेत रिलेशनशिप मॅनेजर आहे. शास्त्रीय गायकीचा बाज असलेल्या अमृता यांनी फडणवीसांच्या कुटुंबात आल्यानंतर राजकीय आणि कॉर्पोरेट, असा दोन्हींचा समतोल साधला. राजकारणात व्यक्ती उच्चपदावर गेल्यानंतरही फडणवीस कुटुंबीय इतरांसारखेच सामान्य आयुष्य जगत आहेत. स्वत:ची नोकरी सांभाळून नवऱ्याच्या राजकीय प्रवासात खंबीरपणे अमृता उभ्या राहिल्या, तर पत्नीच्या कर्तृत्वाला पाठिंबा देत तिची ‘स्व’ओळख जपण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी तेवढय़ाच आनंदाने साथ दिली. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर पोहोचल्यानंतरही ही ‘स्व’ओळख जपण्याचा प्रयत्न असाच राहणार का, असा प्रश्न अनेकांना पडला. त्यावर अमृता फडणवीस यांनी हा समतोल साधावाच लागणार, हे सांगत नोकरी करणाऱ्या स्त्रियांना संदेश दिला. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून जगतानाच, कार्पोरेट जगतातल्या नोकरीत त्या मुंबईकरांमध्ये मिसळून त्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहेत.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांकडून संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रचंड अपेक्षा आहेत. अशा वेळी त्यांची तब्येत सांभाळून त्यांना मानसिक आधार देतानाच नोकरी सांभाळण्याची ही कसरत अमृता फडणवीस करणार आहेत. साडेतीन एकरच्या वर्षां बंगल्यात वावरताना वास्तविक नोकरी करण्याचा विचार आजवरच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केला नसेल. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या सामान्य आयुष्यात ‘मुख्यमंत्री’पदाचा कोणताही अडसर येणार नाहीत, यावर त्या ठाम आहेत.
 ‘बॅनियन ट्री’ आणि ‘मनिप्लँट’
देवेंद्र हा ‘बॅनियन ट्री’ आहे, तर मी एक ‘मनिप्लँट’, असे सांगत प्रत्येक स्त्रीने तिचे स्वत्व जपायलाच हवे. मुख्यमंत्र्यांची पत्नी झाल्यानंतरसुद्धा नोकरी करणार असल्याच्या तिच्या या निश्चयावर देवेंद्र फडणवीसांचीसुद्धा तेवढीच सहमती असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले.