काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी पूर्वापार ओळख असणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यंदा प्रथमच मोदी लाटेवर स्वार होत भाजप-शिवसेना युतीने आपल्या पहिल्या खासदाराची नोंद करत पहिल्यांदाच संघटनात्मक पाय रोवले. त्यातच राष्ट्रवादीचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासारखा बलाढय़ नेता भाजपमध्ये गेल्याने जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची स्थिती नाजूक झाली आहे.  इंदिरा गांधींपासून काँग्रेसचा अभेद्य गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमधील अनुसूचित जमातीसाठी राखीव सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचा बोलबाला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत नवापूर वगळता भाजपच्या हीना गावित यांनी उर्वरित पाचही मतदारसंघांमध्ये निर्णायक आघाडी घेतल्याने आघाडीची धकधक वाढली आहे. सुरुपसिंग नाईक, अमरिश पटेल, पद्माकर वळवी, माणिकराव गावित, के. सी. पाडवी, चंद्रकांत रघुवंशी अशा मातब्बर काँग्रेस नेत्याचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात आतापर्यत काँग्रेस-राष्ट्रवादीतच कोणत्या न कोणत्या प्रकारे काटय़ाची टक्कर होत राहिली.  परंतु राष्ट्रवादीतून हक्कालपट्टी झालेले डॉ. विजयकुमार गावित यांनी कन्या खा. हीनापाठोपाठ भाजपमध्ये प्रवेश केल्याने नगण्य अशी युती अचानक बळकट बनली आहे. त्यातच ‘घराणे एक आणि पक्ष अनेक’ अशी संकल्पना राबवित सहापैकी तीन मतदारसंघात गावित बंधुंनी वेगवेगळया पक्षांकडून दावेदारी केल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळेच निवडणुकीचे स्वरूप ‘काँग्रेस विरुद्ध गावित परिवार’ असे राहू शकते. अशा स्थितीत आपला गड कायम राखण्यासाठी कॉग्रेसला शर्थीचे प्रयत्न करावे लागतील.
तळोदा-शहादा
राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वळवी या मतदार संघातून तब्बल तीन वेळा विजयी झाले आहेत. डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधु आणि मंत्रालयातून कक्ष अधिकारी म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले राजेंद्र गावित हे शिवसेनेकडून इच्छूक आहेत. त्यामुळे वळवी यांना ही निवडणूक सोपी नसल्याचे मानले जाते. त्यातच भाजपच्या उदयसिंग पाडवी यांनीही आपला दावा सांगत प्रचाराचा धडाका लावला आहे.
अक्राणी-अक्कलकुवा
राज्यातील विधानसभेचा क्रमांक एकचा मतदारसंघ म्हणून अक्राणी-अक्कलकुवाची ओळख. २५ वर्षांंपासून काँग्रेसचे अ‍ॅड. के. सी. पाडवी सातत्याने निवडून येत आहेत. यंदाही उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी प्रचार सुरू केला आहे. गाव पुढाऱ्यांना हाताशी धरण्याते ते वाकबगार आहेत. युतीत मात्र या मतदार संघावरुन रस्सीखेच सुरु आहे. बांधकाम विभागातून सेवानिवृत्ती घेतलेले उपअभियंता बी. के. पाडवी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार मानले जातात. दुसरीकडे भाजपचे माजी आमदार डॉ. नरेंद्र पाडवी, जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी आणि आमश्या पाडवी यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे.
नंदुरबार
माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या रुपाने या मतदारसंघात आयता उमेदवार सापडल्याने भाजपच्या गोटात आनंदीआनंद असताना राष्ट्रवादीला मात्र उमेदवार शोधण्यापासून तयार करावी लागणार आहे. १९९५ पासून हा मतदारसंघ डॉ. गावित यांनी आपल्या ताब्यात ठेवला आहे. काँग्रेसमध्ये या मतदारसंघातून तुल्यबळ उमेदवार देण्याची क्षमता असतानाही त्यांच्याकडून तशा प्रकारच्या कोणत्याही हालचाली नसल्याने डॉ. गावितांचे चांगलेच फावणार असल्याची सद्यस्थिती आहे. मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला आल्यास माजी खासदार माणिकराव गावित यांना उमेदवारीसाठी आग्रह करण्यात येऊ शकतो.
साक्री
लोकसभा निवडणुकीत भाजपला निर्णायक आघाडी देणाऱ्या या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे योगेश भोये आमदार आहेत. भाजपकडून मोहन सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुळा गावित हे दोघे इच्छूक आहेत. दोघांमध्ये सुरु असलेली  चुरस पाहता बंडखोरी अटळ मानली जात आहे. बंडखोरी न झाल्यास येथील लढत तुल्यबळ होऊ शकेल. कॉग्रेसकडून योगेश भोये यांच्यासह माजी आमदार डी. एस. अहिरे, बापू चौरे आणि इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांचे नाव चर्चेत आहे.
नवापूर
भाजप- सेना औषधालाही नसलेल्या या मतदार संघावर काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. परंतु २००९ मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविणारे डॉ. विजयकुमार गावितांचे धाकटे बंधु शरद गावित यांनी काँग्रेसचे नेते सुरुपसिंग नाईक यांचा अवघ्या १७०५ मतांनी पराभव करून खळबळ उडवून दिली होती. याच शरद गावित यांनी अलीकडेच राष्ट्रवादीत प्रवेश करत काँग्रेसच्या या मतदारसंघावर दावा केल्याने आघाडीतच या मतदार संघावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. गांधी घराण्याचे निकटवर्तय असलेले सुरुपसिंग नाईक यांनी २००९ चा अपवाद वगळता १९८२ पासून या मतदारसंघावर वर्चस्व ठेवले असल्याने काँग्रेसने मतदारसंघ सोडण्यास नकार दिला आहे. हा वाद न मिटल्यास येथे कुणा एकाची बंडखोरी निश्चित मानली जात आहे.
शिरपूर
काँग्रेसचे दिग्गज आमदार अमरिश पटेल यांचे प्रभूत्व असलेल्या या मतदारसंघाचे नेतृत्व काशीराम पावरा करत आहेत. ‘पटेल सांगतील ती पूर्वदिशा’ असे मानणारे पावरा हेच पुन्हा काँग्रेसचे उमेदवार राहतील अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हीना गावित यांनी या मतदार संघातून ५० हजारपेक्षा अधिकचे मताधिक्य मिळविले होते.भाजपकडून रणजित पावरा, जितेंद्र ठाकूर यांनी उमेदवारीसाठी दावेदारी  केलेली असतांनाच डॉ. विजयकुमार गावित यांचे शालक चोपडय़ाचे राष्ट्रवादी आमदार जगदीश वळवी यांच्या नावाचीही भाजपकडून चर्चा आहे.