शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा योग्य सन्मान राखला जाईल, याची हमी दिली जाणार असेल, तरच शिवसेना भाजपला पाठिंबा देऊन सरकारमध्ये सामील होईल. अन्यथा विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. शिवसेना भाजपच्या दबावापुढे झुकणार नाही. त्यामुळे चेंडू आता भाजपच्या कोर्टात असून त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

शिवसेना नेते दिवाकर रावते, अनिल देसाई, सुभाष देसाई, रामदास कदम, संजय राऊत, खासदार विनायक राऊत यांच्यासह काही नेत्यांबरोबर ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रवक्ते खासदार राऊत यांनी शिवसेना गुरुवारी घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना सरकारमध्ये सामील होणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. सत्तेत सहभागी व्हावे की नाही, याबाबत शिवसेना नेत्यांमध्ये दोन मतप्रवाह असून सत्तेत न गेल्यास शिवसेना फुटण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शिवसेना भाजपपुढे सत्तेसाठी झुकणार की स्वाभिमान दाखविणार, अशी चर्चा सुरु आहे.

भाजपने शिवसेनेकडे विनाअट पाठिंबा मागितला आहे. शिवसेनेला सरकारमध्ये किती सहभाग दिला जाईल, याविषयी भाजपने काहीही सांगितलेले नाही. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यावर ते ठरविण्याची भाजपची भूमिका आहे. मात्र हे शिवसेनेला मान्य नसून ठाकरे व शिवसेनेचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे. सत्तेत किती मंत्रीपदे व कोणती खाती मिळतील, हे आधी स्पष्ट केले, तरच सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय शिवसेना घेईल आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पाठिंबा दिला जाईल. अन्यथा विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची शिवसेनेची तयारी असल्याची भूमिका अनेक नेत्यांनी ठाकरे यांच्यापुढे बैठकीत मांडली. ठाकरे व शिवसेनेचा सन्मान राखला जाईल, असा योग्य निर्णय घेण्याचे सर्वाधिकार ठाकरे यांना एकमताने देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

माफीनामा मागितलेला नाही
पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक टीकास्त्र सोडल्याने त्यांची माफी मागण्याचा आग्रह भाजपने धरला आहे का किंवा शिवसेनेकडे तशी भूमिका मांडली आहे का, असे विचारता त्यात काहीही तथ्य नसल्याचे माथूर यांनी स्पष्ट केले. निवडणूक काळात टीका होते, ते सारे आता संपले असल्याचे माथूर यांनी सांगितले. शिवसेनेच्या पाठिंब्याची गरजच नसल्याने त्यांना झुलवत ठेवून केवळ भाजप मंत्र्यांचा शपथविधी पार पाडायचा आणि विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यावर शिवसेनेचा विचार करायचा, अशी रणनीती भाजपने आखली आहे. त्यामुळे भाजपला पाठिंबा देऊन सरकारमध्ये सामील व्हायचे की नाही, याबाबत शिवसेना द्विधा मनस्थितीत आहे. शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नसून आम्हीही तसा प्रस्ताव दिलेला नाही, असे माथूर यांनी स्पष्ट केले.