भाजप जिंकावा यासाठी गावाकडे त्याने बरेच कष्ट केले होते. आता आपलं सरकार बनणार..देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या सोहळ्याला आपणही साक्षीदार असावे म्हणून गणपतराव व त्यांचे मित्र दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून होते. घरच्या सोहळ्याची निमंत्रणपत्रिका मिळावी यासाठी पक्षाच्या कार्यालयात त्यांनी पाठपुरावा केला आणि गणपतरावांना ‘व्हीआयपी’ पासेस देण्यात आले. कालपासून मंत्रालयाजवळील भाजपच्या कार्यालयात तसेच एकनाथ खडसे व विनोद तावडे यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांची अक्षरश: रिघ लागली होती. पंढरीच्या वारीला जाऊन विठूरायाचे दर्शन घ्यावे एवढय़ा भक्तिभावाने त्यांनी शुक्रवारी शपथविधी समारंभाला उपस्थिती लावली अन् मरिन लाईन्स समोरील समुद्रात बोटीवरील भव्य कमळाचे दर्शन घेत आपल्या गावाकडे रवाना झाले..
भाजपला विधानसभेत सर्वाधिक जागा मिळाल्या आणि मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली त्या क्षणापासूनच भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांची पावले मुंबईकडे वळू लागली. कोणी गावाकडच्या आमदाराकडे निमंत्रण पत्रिकेसाठी पाठपुरावा केला तर बहुतेकांनी मुंबईतील पक्षाचे कार्यालय गाठले. गुरुवार सकाळपासून भाजप प्रदेश कार्यालयात पासेससाठी लोकांची झुंबड उडाली होती. कोणाला पास द्यायचे, द्यायचे तर किती द्यायचे असा सवाल पक्षकार्यालयातील पदाधिकाऱ्यांपुढे पडला होता. शुक्रवार सकाळपासून विनोद तावडे व एकनाथ खडसे यांच्या मंत्रालयासमोरील घरासमोर भाजपचे झेंडे व टोप्या घालून कार्यकर्त्यांचे थवेच्या थवे येऊ लागले. प्रत्येकाला शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावयाचे होते. साऱ्यांनाच पास देणे शक्य नव्हते. होते तेवढे वाटून टाकले. अखेर शपथविधीसाठी पासची गरज नाही तुम्ही थेट गेला की प्रवेश मिळेल, असे नम्रपणे कार्यालयांमधील पदाधिकारी सांगत होते. अखेर कोकणातून आलेला एक कार्यकर्ता चिडून म्हणाला, तुमची मत मागतानाची वागणूक आणि आता पासेस देतानाची वागणूक यात कमालीचा फरक आहे.
अनेकांना नाराज व्हावे लागू शकते हे लक्षात घेऊन शपथविधी समारंभ सर्वासाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हजारोंच्या संख्येने लोक वानखेडे स्टेडियमकडे रवाना झाले.