रामदास आठवले यांना राज्यसभेची खासदारकी मिळवून देण्यासाठी आपण स्वत: शब्द टाकला होता, असा गौप्यस्फोट सोमवारी उद्धव ठाकरे यांनी केला. गेल्या आठवड्यात भाजपने शिवसेनेशी असलेली २५ वर्षांची युती तोडल्यानंतर रामदास आठवलेंनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आठवले यांच्या खासदारकीसाठी आपण स्वत: नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांना जाऊन भेटलो होतो. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान झालेले पाहायचे असेल तर महाराष्ट्रातील दलित जनतेचा पाठिंबा मिळणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आठवलेंना खासदारकी देण्याची गरज असल्याचे आपणच मोदी आणि राजनाथसिंहांना पटवून दिल्याचे उद्धव यांनी सांगितले. मागील वर्षी जेव्हा शिवसेना-भाजप युतीमध्ये रिपाईचा समावेश करण्यात आला तेव्हा भाजप नेते रामदास आठवले यांना राज्यसभेची खासदारकी देण्यास अनुत्सूक असल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून त्यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली. रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्रिपदाच्या मोहापायी राज्यातील आंबेडकरी जनतेला दगा दिल्याचे ‘सामना’तील अग्रलेखात म्हणण्यात आले आहे. आठवलेंसारख्या गोंधळी नेतृत्वामुळेच आंबेडकरी विचारांची वाट लागल्याचे टीकास्त्र शिवसेनेकडून सोडण्यात आले होते. यापूर्वी शनिवारी मुंबई येथे झालेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी आठवलेंसमोर शिवसेनेसोबत आल्यास उपमुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.