गेल्या २५ वर्षांत शिवसेना- भाजप युतीचे संबंध जपण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गुरूवारी युतीमध्ये आलेल्या वितुष्टाच्या पार्श्वभूमीवर आपले मौन सोडले. शिवसेना- भाजपची युती कायम राहणे ही माझ्यासाठी आनंददायी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जागावाटपाचे सूत्र योग्य नसल्यामुळे भाजपला आणखी जागा मिळाल्या पाहिजे होत्या. त्यामुळे जागावाटपावरून आमच्या पक्षातील लोकांनी घेतलेली भूमिकाही योग्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मला फोन करून युती तुटल्याचे सांगितले, तेव्हा मी नितीन गडकरींना फोन करून यासंदर्भात चर्चा केली. त्यावेळी गडकरींनी मला याप्रकरणात लक्ष घालू, असे सांगितले होते. शिवसेना-भाजप यांच्यात झालेल्या जागावाटपाच्या बोलणी प्रक्रियेत सहभागी नसल्यामुळे नक्की काय घडले, हे आपल्याला माहिती नसल्याचे अडवाणी यांनी सांगितले.