राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आव्हान देत महायुतीच्या वाटेने निघालेले किसन कथोरे आणि गणपत गायकवाड या ठाणे जिल्ह्य़ातील आमदारद्वयीमुळे शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांत स्थानिक पातळीवर बंडाचे नवे निशाण उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काल-परवापर्यंत राष्ट्रवादीसोबत संग करणाऱ्या गणपतरावांना पक्षात घ्याल तर ‘याद राखा’, असा जाहीर इशारा शिवसेनेतील ११ ज्येष्ठ नगरसेवकांनी थेट ‘मातोश्री’वर पत्र पाठवून दिला आहे. तर मुरबाडच्या किसन कथोरेंच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक राहिल्याने पक्षातील एक मोठा गट अस्वस्थ आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करून नुकतेच खासदार बनलेले कपिल पाटील आणि कथोरेंचे ताणलेले राजकीय संबंध लक्षात घेता ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण पट्टय़ात वर्चस्वासाठी भाजपमध्ये नवा सत्तासंघर्ष सुरू होण्याची चाहूल लागली आहे.  
लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांच्या पराभवासाठी कथोरेंनी जंग जंग पछाडले होते. या भागातील राष्ट्रवादीचे कुणबी नेते आणि कथोरेंचे कट्टर विरोधक गोटीराम पवार यांना भाजपमध्ये आणण्याची व्यूहरचना खासदार पाटील गटाकडून आखली जात होती. तसेच शिवसेनेतील काही नेते विधानसभेचे तिकीट मिळावे यासाठी भाजप-प्रवेशासाठी इच्छुक होते. मात्र, भाजपतील काही जुन्या नेत्यांना हाताशी धरून कथोरेंनी पक्षप्रवेश सुकर केला.
दरम्यान, कथोरेंच्या प्रवेशाविषयी भाजपमध्ये कोणताही संघर्ष नसून निवडून येण्याची शक्यता लक्षात घेता त्यांना पक्षात प्रवेश द्यायला हवा, असे मुरबाड, बदलापूर पट्टय़ात अनेक जुन्या कार्यकर्त्यांचे मत आहे, असा दावा भाजपचे नेते संजय केळकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. कपिल पाटील यांचा त्यांना विरोध असण्याचे कारणच नाही, असेही ते म्हणाले.  

गायकवाडांना जाहीर विरोध
 कथोरे यांचा भाजप-प्रवेश निश्चित असला तरी कल्याण (पूर्व)चे अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांना शिवसेनेत घेऊ नये, यासाठी पक्षातील ११ नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर नाराजीपत्र पाठविल्याने गायकवाड यांच्या पक्षप्रवेशासाठी उत्सुक असलेल्या आमदार एकनाथ शिंदे यांना आव्हानउभे राहिले आहे. कल्याणच्या महापौर कल्याणी पाटील यांच्यासह मल्लेश शेट्टी, कैलाश शिंदे यांच्यासारख्या नगरसेवकांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. दरम्यान, शिवसेनेतील काही जण नाराज असले तरी आपण ही नाराजी दूर करू आणि आदेश येताच पक्षात प्रवेश करू, अशी प्रतिक्रिया आमदार गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

पाचुपते, कथोरे वा सूर्यकांता पाटील यांनी स्वार्थाकरिता पक्ष सोडल्याचे स्पष्टच आहे. नेते पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ते पक्षात कायम आहेत. शेवटी कार्यकर्ते हीच पक्षाची खरी शक्ती असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली.