सत्तास्थापनेच्या आधीच भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारावे असा आग्रह त्यांचे कट्टर समर्थकांनी लावून धरला असून त्यानिमित्ताने गडकरीसमर्थकांचे दबावतंत्र सुरू झाल्याची चर्चा आहे.
गडकरींनी मुख्यमंत्री व्हावे, अशी माझी इच्छा असून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, यांच्यासह काही नेत्यांनीही त्यास याआधीही दुजोरा दिला आहे, असे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मात्र, मी दिल्लीतच आनंदी असून महाराष्ट्रात परतण्याचा विचार नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केल्यानंतरही विदर्भातील काही आमदार आग्रही आहेत. शिवसेनेबरोबर सरकार स्थापन झाले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन किंवा अल्पमतातील सरकार चालविण्यासाठी अनुभवी मुख्यमंत्री असावा, असे कारण देत गडकरी समर्थकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा आणि सरकार स्थापनेचा निर्णय दिवाळीनंतरच घेतला जाणार आहे. दिवाळी होईपर्यंत अवधी असून राजनथासिंह व जे. पी. नड्डा हे केंद्रीय निरीक्षक २६ वा २७ ऑक्टोबरला मुंबईत येतील. मात्र, सध्या भाजपच्या प्रदेश नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून सुप्त संघर्ष असल्याचे दिसू लागले आहे. प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर असून केंद्रीय नेतृत्वही त्यांच्यासाठी अनुकूल असल्याचे दिसून येत होते. मात्र एकनाथ खडसे, मुनगंटीवार हे नेते ज्येष्ठ असून त्यांच्यासह तावडेही या पदाच्या स्पर्धेत आहेत. फडणवीस यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होण्याच्या वेळी मुनगंटीवार यांचीच पुन्हा त्या पदी नियुक्ती व्हावी, असे प्रयत्न होते. मुनगंटीवार यांच्यासाठी गडकरी यांनी त्यावेळी शिफारस केली होती आणि आताही त्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी ते प्रयत्न करीत आहेत.
फडणवीस यांना तरुण वयात प्रदेशाध्यक्षपद व लगेच मुख्यमंत्रिपद मिळण्याची संधी चालून येत असल्याने अन्य नेत्यांकडून या मार्गात अडथळे उभे केले जाण्याची शक्यता आहे. गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदी यावे, अशी मागणी केल्यावर कोणीही प्रदेशातील नेता विरोध करू शकणार नाही व आमदारांचे समर्थनही मिळेल. त्याचबरोबर गडकरी हे आपली इच्छा नाही, असे सांगत असले तरी शेवटी महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पक्षाने दिल्यावर ते नाकारणार नाहीत, असे काही नेत्यांना वाटते.
(संबंधित : सत्ताबाजार)