रविवारचं जेवण करून राजूभाई बांधावरल्या बाजल्यावर बसले होते. उसाच्या पाचटानं शाकारलेल्या झोपडीतल्या हॉलमधला टीव्हीचा आवाज मुद्दामच मोठा करून ठेवला होता.
शिवाय, हातातला मोबाइलवरही मिनिटा मिनिटाला वाजून ऱ्हायला होता.. राजूभाईंचे डोळे मोबाइलवर आणि कान टीव्हीवर खिळले होते.
अचानक टीव्हीचा आवाज वाढला, आणि राजूभाई बाजल्यावरून उठून हॉलमध्ये गेले. ‘आम्ही आता यापेक्षा अधिक काही करू शकत नाही’, असा निर्वाणीच्या सुरातला एक इशारा त्यांच्या कानावर पडला, आणि पाठोपाठ टीव्हीत घोषणा घुमू लागल्या.. राजूभाईंनी ओळखलं. जे होणार होतं, ते जवळ येतंय, याची त्यांना जाणीव झाली, आणि त्यांनी महादेवरावांना फोन लावला.
‘दादा, तुम्ही तर जानताच सगळं.. काय होतंय हे? आता आपन काय करायचं?’.. राजूभाईंनी दादांना एका दमात विचारलं, आणि पलीकडनं महादेवरावांचा एक सुस्कारा राजूभाईंच्या कानात घुसला.
‘रामदासभाऊंस्नी घिऊ काय फोनवर?’.. महादेवरावांनी राजूभाईंना विचारलं, आणि डाव्या हातात फोन धरलेल्या राजूभाईंनी उजवा हात जोरजोरात हलवला.. ‘नको नको.. त्यांस्नी काय फरक पडत न्हाई. ते काय, कुटंबी बसत्यात फिट्ट’.. राजूभाई म्हणाले.
‘दादा, आपली मैत्री आता जमल्याली आसली, तरी जुनं मित्र आसं राजकारन करत आस्तील तर कशी टिकनार?’.. राजूभाईंनी चिंतेच्या सुरात विचारलं, आणि महादेवरावांनी पुन्हा एक सुस्कारा सोडला.
‘राजूभाई, ह्य़े बरं झालं बगा.. ते जुने मित्र, आपलाच बकरा करायला निगाल्यालं.. आता कोन कुनाचा आनि कसला बकरा.. आपलं आपलं बगू, नि उतरू मैदानात.. न्हाईतरी, ते समदंच, गाजराच्या पुंगीवानी व्हतं. आपल्याला आपला पक्ष वाहाडवायचा हाय न्हवं?.. मग उठा’.. महादेवभाई म्हणाले, आणि राजूभाईंना मुंबईच्या फ्लायओव्हरवरून जातानाचं पोस्टर आठवलं.
‘उठा?.. म्हंजे, पुन्हा मातोश्रीवर जायचं का काय?’.. राजूभाईंनी विचारलं.
‘न्हाई न्हाई, तसं न्हाई, उठा म्हणजे, कामाला लागा.. मातोश्रीवरले उठा न्हाई’.. महादेवराव समजावणीच्या सुरात म्हणाले.
‘पन उठा, आनि करायचं काय?’.. राजूभाईंनी विचारलं. महादेवरावांच्या मनात काय चाललंय, ते कळावं, म्हणून राजूभाईंचे प्रयत्न सुरू होते.
‘त्यो मनातलं काय ते बोलतच न्हाई’.. राजूभाई स्वतशीच चरफडत म्हणाले.
‘राजूभाई, तुमी सांगा.. काय करूयात?’.. महादेवरावांनी विचारलं.
‘काही न्हाई, उठा.. तुमी म्हंता तसंच. आता प्रेसवालं फोन करतील. त्यास्नी मी तर सांगून टाकनार आहे. त्यांचं जमलं, तर ठीकच हाय. आमीपन तसंच प्रयत्न पुन्हा करनार आहोत. मी स्वत जाईन. आसं यवडं मस्त रंगल्यालं इंद्रधनुष्य का काय, ते पुसून चालनार न्हाई. बगू या.. नायतर, तुमी म्हनता तसं, हायचं, गाजराची पुंगी.. आपन बी स्वबळावर लढून टाकू.. उद्या काय व्हील, त्यावर मग फुडलं काय ते ठरवू. कसं?’.. राजूभाई म्हणाले.
पलीकडे महादेवरावांनी वाजवलेल्या चुटकीचा आवाज राजूभाईंना स्पष्ट ऐकू आला होता.
काका कानजी