महाराष्ट्रातील जनतेने केलेला पराभव आम्हाला मान्य असून आता लवकरच नव्या दमाने महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागू असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. हा पराभव मनसेला बरेच काही शिकवून गेला असून आम्ही लोकांचा विश्वास निश्चितपणे मिळवू असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
विधानसभेतील धक्कादायक पराभवानंतर शिवाजी पार्क येथील कृष्णभुवन या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी नादंगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, मंगेश सांगळे यांच्यासह पराभूत आमदार तसेच पक्षाच्या सरचिटणीसांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मनसेचे जुन्नरमधून निवडून आलेले एकमेव आमदार शरद सोनावणे हेही या बैठकीला उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत मनसे सोडणार नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. युती व आघाडी वेगळे लढूनही मनसेला मुंबईसह ठाणे, पुणे व नाशिकमध्ये एकही आमदार विजयी का झाला नाही, याचा आढावा घेऊन महापालिका निवडणुकीसाठी तयारी करण्यात येणार आहे. एकहाती सत्ता देण्याची मागणी करणाऱ्या राज यांच्या मनसेचा अवघा एकच आमदार कसा विजयी झाला याचा शोध घेतानाच मुंबई महापालिकेच्या दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी तयारी करण्यावर भर दिला जाईल, असेही मनसेच्या सूत्रांनी सांगितले.  
मनसेचे ‘इंजिन’ निवडणूक आयोगाच्या यार्डात!
विधानसभेतील पराभवामुळे, प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली मान्यताही गमावण्याची वेळ राज ठाकरे यांच्या ‘मनसे’वर आली आहे. गेल्या निवडणुकीत तेरा आमदार विजयी झाल्यानंतर मनसेला मिळालेले ‘इंजिन’ हे  चिन्हही निवडणूक आयोगाच्या यार्डात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूण मतदानापैकी ३.२ टक्के मते मनसेला मिळाली. प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी तसेच चिन्ह मिळण्यासाठी एकूण मतदानापैकी किमान सहा टक्के मते मिळणे तसेच किमान दोन आमदार विजयी होणे आवश्यक असते. इंजिन हे  चिन्ह गोठविण्यात आले तर आगामी महापालिका निवडणुकीत अडचणीत वाढ होऊ शकते असे मनसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.