१९९९, २००४ आणि २००९ या लागोपाठ तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईने काँग्रेस आघाडीला साथ दिली आणि सत्तेचा सोपान गाठणे शक्य झाले. यंदा मात्र काँग्रेससाठी मुंबई अवघड असली तरी मनसे कितपत प्रभाव पाडतो यावर शिवसेना आणि भाजपचे भवितव्य अवलंबून आहे.
एकूण ३६ जागा असलेल्या मुंबईमध्ये साऱ्याच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संमिश्र वस्ती असलेल्या मुंबईने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला, तर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला कौल दिला आहे. १९९९ मध्ये तर मुंबईच्या जोरावरच काँग्रेसला राज्याची सत्ता मिळाली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने २० जागा जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले होते. परंतु अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईकरांनी शिवसेना-भाजपला कौल दिला. मोदी लाटेचा मुंबईत चांगलाच परिणाम झाला.
लोकसभा निवडणुकीचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता कमी असली तरी काँग्रेसचे शहरातील आमदार व नेते धास्तावले आहेत. दुसरीकडे लोकसभेच्या यशाने भाजप आणि शिवसेनेच्या गोटात आत्मविश्वास बळावला आहे. २००९ मध्ये मनसेच्या मतविभाजनाचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला. मनसे घटक  किती प्रभावी ठरतो यावरही मुंबईतील काँग्रेस आणि विरोधकांचे भवितव्य ठरणार आहे. लोकसभेच्या वेळी मनसेचा फार काही प्रभाव पडला नाही. विधानसभेत मनसेचे इंजिन जोरात पळाल्यास शिवसेना आणि भाजपलाच त्याचा फटका बसू शकतो.  भाजप आणि शिवसेनेत निर्माण झालेला बेबनाव, त्याचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर होणारे संभाव्य परिणाम हे सारेच घटक महत्त्वाचे ठरणार आहेत. शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र चुली मांडल्यास काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकतो.
 दक्षिण मुंबईत काँग्रेसमध्ये कुलाब्यात उमेदवारीवरून धुसफुस आहे. दुसरीकडे विलेपार्ले मतदारसंघावर भाजपने दावा केला असला तरी शिवसेनेने हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला आहे. वांद्रे पूर्व या मतदारसंघातून काँग्रेसमध्ये २१ जणांनी उमेदवारी मागितली आहे.
मुंबईतील विधानसभा मतदारसंघांचा लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा
दक्षिण मुंबई
कुलाबा ते परळपर्यंत पसरलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात लोकसभेच्या वेळी भायखळा आणि मुंबादेवी या दोन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसला आघाडी मिळाली होती. मराठीप्रमाणेच गुजराती, मारवाडी, मुस्लीम मतदारांचे प्राबल्य असलेल्या या विभागात काँग्रेससमोर यंदा मोठे आव्हान आहे. मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. लोकसभा निवडणुकीत ते स्वत:च्या मतदारसंघात पिछाडीवर राहिले. राज्यात प्रचारासाठी फिरायचे असल्याने यंदा निवडणूक लढवायची नाही, अशी नांदगावकर यांची भूमिका आहे. नांदगावकर यांच्या मतदारसंघात विजय मिळवायचाच या निर्धाराने शिवसेना रिंगणात उतरणार आहे.
दक्षिण मध्य-मुंबई
दादर-माहीम हा बालेकिल्ला कायम राखणे या वेळी मनसेला तेवढे सोपे नाही. तर दादरमध्ये मनसेला रोखायचे ही शिवसेनेची योजना आहे. चेंबूर, धारावी, वडाळा आणि शीव-कोळीवाडा हे चार विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असले तरी यंदा काँग्रेससाठी हे मतदारसंघ कायम राखणे तेवढे सोपे नाही. काँग्रेसला ताकद लावावी लागणार आहे. शिवसेनेने या विभागात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
ईशान्य मुंबई  
मुलुंड ते मानखुर्दपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. गेल्या वेळी भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपरमध्ये मनसेचे आमदार निवडून आले होते. यंदा हे यश कायम ठेवण्याचे मनसेसमोर आव्हान आहे. शिवसेना आणि भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेता मनसेची कसोटी लागणार आहे. गेल्या वेळी येथून आघाडीचा एकही आमदार निवडून आला नव्हता. महापालिका निवडणुकीतही काँग्रेसला अपयशच आले होते. मानखुर्दसाठी समाजवादी पार्टीचे अबू असिम आझमी यांना लढत द्यावी लागणार आहे.
उत्तर- पश्चिम
अंधेरी ते गोरेगाव-दिंडोशीपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेसाठी वातावरण अनुकूल आहे. गेल्या वेळी सहापैकी चार आमदार काँग्रेसचे निवडून आले होते.आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, माजी महापौर सुनील प्रभू, सुभाष देसाई आणि रवींद्र वायकर यांची कसोटी लागणार आहे.
उत्तर मुंबई
लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्य भाजपचे गोपाळ शेट्टी यांना मिळाले होते. सर्व सहाही जागा जिंकण्याचे भाजप-शिवसेनेचे प्रयत्न आहेत. बोरिवलीमध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे नशीब अजमाविणार आहेत.
उत्तर मध्य
कुर्ला, चांदिवली, वांद्रय़ापर्यंतचा हा मतदारसंघ वास्तविक काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जायचा. पण लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला. कृपाशंकर सिंग (कलिना) आणि नसिम खान (चांदिवली) या दोन बडय़ा आमदारांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी प्रिया दत्त यांनी काँग्रेस पक्षाकडे केली आहे. कारण या दोघांनी आपल्या पराभवास हातभार लावल्याचा त्यांचा आरोप आहे. परिणामी, काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नसणार हे स्पष्टच आहे.

lok sabha election 2024 congress in limelight after kanhaiya kumar nominated from north east constituency in delhi
कन्हैया कुमारांमुळे दिल्लीत काँग्रेस चर्चेत
Fear for BJP in North and Congress in East Nagpur Strong line-up from both candidates
रणसंग्राम लोकसभेचा : भाजपला उत्तरमध्ये, काँग्रेसला पूर्व नागपुरात भीती; दोन्ही उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी
BJP test, Congress, West Nagpur,
काँग्रेसच्या गडात भाजपची कसोटी, पश्चिम नागपूरमध्ये कडव्या झुंजीचे संकेत
RSS claims of support to Congress in Lok Sabha elections
‘आरएसएस’चा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंब्याचा दावा, जाणून घ्या सविस्तर…