पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट महाराष्ट्रात असल्याचा विश्वास जर भाजपच्या नेत्यांना वाटत आहे, तर मोदींच्या २०-२२ सभांचे आयोजन का करण्यात येत आहे, असा सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केला. मोदी यांच्याशी चर्चेनंतरच केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या राजीनाम्याचा व रालोआतून बाहेर पडण्या-बाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही ठाकरे म्हणाले. शीख संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना मोदी लाटेबाबत वक्तव्य केले व भाजपवर टीका केली. भाजपच्या काही प्रदेश नेत्यांना मोदी लाटेवर विश्वास असल्याने युती तोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आता त्यांच्या सभांचे आयोजन होते, अशी टिप्पणी त्यांनी केली.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पारंपरिक पध्दतीने होईल. पण निवडणूक आचारसंहिता असल्याने जाहीर सभा तेथे होणार नाही. शस्त्रपूजा व अन्य कार्यक्रम मात्र तेथे होतील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मनसेशी युती नाही
मनसे-शिवसेना एकत्र येण्याचा मुद्दा ठाकरे यांनी फेटाळून लावला. राज ठाकरे हे आजारी असल्याने शिष्टाचार म्हणून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. त्यामुळे इतरांची तब्येत बिघडण्याचे काही कारण नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.