लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा तडाखा विधानसभा निवडणुकीतही बसू शकतो, हे ओळखून अगोदरच भाजपच्या तंबूत दाखल झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीमधील काही माजी मंत्री-आमदारांपैकी आयाराम सुखरूप किनाऱ्याला लागले, मात्र बबनराव पाचपुते, संजय देवतळे, अजित घोरपडे, प्रकाश शेंडगे यांसारख्या राजकारणातील तरणपट्टूंना गटांगळ्या खाव्या लागल्या.
लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेने काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज नेते धास्तावले होते. सत्तेच्या परिघात कायम रहायचे तर, भाजप किंवा शिवसेनेशिवाय पर्याय नाही, असे वाटणारे अनेकजण संधी शोधत होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच बबनराव पाचपुते व मधुकर पिचड या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भांडणे विकोपाला गेली. ती संधी साधून पाचपुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनेही त्यांना श्रीगोंदा मतदारसंघातून दिली, मात्र मतदारांनी त्यांना नाकारले आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून दिले.  
आघाडी सरकारमध्ये साडेतीन वर्षे मंत्री राहिलेले संजय देवतळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि ते भाजपमध्ये सामील होऊन त्यांनी वरोरामधून निवडणूक लढविली. परंतु शिवसेनेकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात भाजपचा झेंडा रोवताच, अपक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करुन भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री अजित घोरपडे यांना काही मोदी लाट पावली नाही. माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पराभवासाठी त्यांनी कंबर कसली होती. परंतु तासगाव-कवठे महंकाळच्या मतदारांनी आबांच्याच बाजूने कौल दिला. ‘अबकी बार घोरपडे सरकार’ या घोषणा फक्त भिंतीवर व फलकावरच राहिल्या.
नंदुरबार जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार करण्याचा विडा उचलेल्या गावित बंधूंना विजयासाठी कोणत्याही पक्षाचे वावडे नाही. मागील निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झालेले शरद गावित यांनी या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली, परंतु सुरुपसिंग नाईक यांच्यासारख्या काँग्रेसच्या बडय़ा नेत्याने त्यांना पराभवाची धूळ चारली.
भाजप सोडून ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन लढणाऱ्या प्रकाश शेंडगेंनाही मतदारांनी धुडकावून लावले. त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला मतदारांनी पसंती दर्शविली.
दोनवेळा निवडून आलेले आणि मंत्रीपदावर असतानाच रत्नागिरीचे उदय सामंत राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत का गेले हा साऱ्यांनाच पडलेला प्रश्न होता. परंतु त्याचे उत्तर निकालाने दिले. डॉ. विजयकुमार गावित हे स्वतच ताकदवान उमेदवार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेले तरी या वेळेही त्यांचा नंदुरबार मधून विजय झाला. टोलच्या प्रश्नावर नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले प्रशांत ठाकूर हेही पनवेलमध्ये विजयी झाले.
मागील निवडणुकीत केवळ राष्ट्रपतीपदी असलेल्या प्रतिभाताई पाटील यांचा मुलगा म्हणून रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी देऊन डॉ. सुनील देशमुख यांच्यावर अन्याय केला होता. मात्र या वेळी देशमुख यांनी भाजपच्या तिकिटावर लढले आणि शेखावत यांचा पराभव करुन अन्याय करणाऱ्या काँग्रेसलाही त्यांनी धडा शिकविला.