पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेले विकासाचे ‘मॉडेल’ कुचकामी ठरले असून ‘खोटे बोला पण रेटून बोला’ हेच त्यांचे धोरण आहे. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत गुजरातपेक्षा कितीतरी पुढे आहे. भाजप-शिवसेनेने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अजूनही दृष्टीपथात दिसत नाही. मोदींच्या भोवती भ्रष्टाचारी नेत्यांचे कोंडाळे आहे, अशी टीका उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख नारायण राणे यांनी सोमवारी येथे केली.
येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित काँग्रेसच्या पहिल्या निवडणूक प्रचार सभेत नारायण राणे यांनी भाजप-शिवसेनेवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. भाजप-सेनेने खोटेनाटे बोलून सत्ता मिळवली असून त्यांना आता धडा शिकवला पाहिजे. दंगली भडकवणे आणि त्यावर सत्तेची पोळी शेकणे हेच काम या पक्षांनी केले आहे. या लोकांचा खोटारडेपणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेसमोर उघड केला पाहिजे, असे राणे म्हणाले.
मोदी यांचे ‘अच्छे दिन’ कुठे गेले, याचा जाब आता विचारला पाहिजे. महागाई कमी झाली नाही. गंगेची साफसफाई कुठवर आली, काळा पैसा आणण्याचा नारा कुठे विरला, असे अनेक प्रश्न आता सरकारला विचारले पाहिजेत. भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. भाजपच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, पण मोदी गप्प आहेत. जगातील १० श्रीमंतांमध्ये मोदींच्या एका निकटस्थ उद्योगपतींचा समावेश आहे. त्यांची श्रीमंती १५२ टक्क्यांनी वाढली असा आरोप राणेंनी केला
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी लायक नाहीत
ज्या व्यक्तीला धड बोलता येत नाही, विधानसभेचे कामकाज कसे चालते, याचा अनुभव नाही, त्यांनी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहू नये. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यास लायक नाहीत. मुळात त्यांच्यात काम करण्याची कुवतच नाही, अशी टीका उद्योगमंत्री नारायण राणे यांनी येथे केली.प्रचार सभेनंतर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचीच सत्ता पुन्हा स्थापन होईल, असा दावा केला. काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी येत्या २५ तारखेला जाहीर केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.