काँग्रेस पक्षाच्या वतीने येत्या १७ सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, असे काँग्रेसचे प्रचारप्रमुख तथा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेस पक्षाची उमेदवारांची पहिली यादी १७ सप्टेंबरला जाहीर होईल. तसेच मोदी सरकारविरोधात राज्यात मोठा संताप आहे, असे सांगताना काँग्रेस पक्षाला त्यामुळे मोठे यश मिळेल, असे राणे म्हणाले.
काँग्रेस पक्षाने मला कुडाळ-मालवण याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सांगितले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक मी लढविणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. कणकवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे नितेश राणे यांनी उमेदवारी मागितली आहे. ते एकमेव उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळेल, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला. माजी आमदार राजन तेली काँग्रेस पक्षात नाहीत. त्यामुळे त्यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मदत करण्याचा प्रश्नच नाही. काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला तेथे मदत केली जाईल, असे नारायण राणे म्हणाले.
या वेळी आमदार विजय सावंत यांच्या साखर कारखान्यावर बोलताना नारायण राणे यांनी साखर कारखाना ते चालवू शकणार नाहीत. साखर कारखान्यात मोठय़ा प्रमाणात नोकरभरती होत नाही, असे सांगत सावंत यांचा समाचार राणे यांनी घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून विजय मिळविण्याचे नियोजन केले जाईल, असे राणे म्हणाले.