कधी काळी शरद पवार यांचे एकहाती वर्चस्व असलेल्या नगर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सलग दुसरा विजय मिळवत घट्ट पाय रोवले. राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात विधानसभेच्याही सहापैकी दोनच मतदारसंघात त्यांना गेल्या वेळी यश मिळाले. आता तर, एकच जागा शाश्वत आहे. एका मतदारसंघात उमेदवारीसाठी काँग्रेसच्या नेत्याला आयात करावे लागले तर उर्वरित एक मतदारसंघ ते काँग्रेसला सोडून देण्याच्या विचारात आहेत आणि एका मतदारसंघात ते बाहेरच्या जिल्ह्य़ातील नेत्याला रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. राहिलेल्या तीन मतदारासंघापैकी एकाच ठिकाणी त्यांना खात्रीशीर यश मिळू शकते. सर्व म्हणजे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात त्यांची स्थिती दारुण आहे.
नगर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. या निवडणुकीच्या तोंडावर बबनराव पाचुपते यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांची भाजपमध्ये प्रवेश केला.
 या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद क्षीणच आहे. मात्र संस्थात्मक ताकद मोठी असतानाही राष्ट्रवादीच्या झालेल्या वाताहतीचे मूळ अंतर्गत गटबाजीत आहे. मात्र, याचा अर्थ युतीची ताकद वाढली असे मात्र नाही. संस्थात्मक ताकद आणि रचनात्मक कार्यात त्यांचे योगदान नाही. काँग्रेस आघाडीच्या पाडापाडीच्या राजकारणात त्यांचे फावते, मात्र त्यांनाही आता संघर्ष करावाच लागेल.
नगर शहर
हा शिवसेनेचा बालेकिल्ला. गेली २५ वर्षे येथून शिवसेनेचे अनिल राठोड हेच निवडून येत आहेत. आताही उमेदवारी निश्चित असल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आघाडीत मात्र काँग्रेस की राष्ट्रवादी याचाच फैसला अद्यापि झालेला नाही. गेल्या वेळी ही जागा काँग्रेसकडे होती. त्यावर युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे प्रबळ दावेदार आहेत. मात्र या जागेसाठी राष्ट्रवादीकडून शहराचे महापौर संग्राम जगताप यांनी उमेदवारीचा निर्णय होण्याआधीच प्रचाराचाही शुभारंभ केला आहे. मनसेकडून वसंत लोढा तयारीला लागले आहेत.
राहुरी
कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात त्यांचे मातब्बर नेते प्रसाद तनपुरे यांना दोन निवडणुकांमध्ये येथे पराभव पत्करावा लागला. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांनी तनपुरे यांचा पराभव केला होता. आताही भाजपकडून कर्डिले यांची उमेदवारी निश्चित आहे. मात्र राष्ट्रवादीत तनपुरे की त्यांची पत्नी डॉ. उषाताई, की शिवाजी गाडे (काँग्रेस) याचा निर्णय अद्यापि झालेला नाही.
शेवगाव/पाथर्डी
सद्यस्थितीत राष्ट्रवादीकडे राहिलेला हा एकमेव मतदारसंघ. राष्ट्रवादीकडून आमदार चंद्रशेखर घुले यांची उमेदवारी याहीवेळी निश्चित आहे. यातील पाथर्डी तालुका ऊसतोडणी मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो, त्यावर (स्व) गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे-पालवे यांचे प्राबल्य आहे. लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार राजीव राजळे यथे काय करतात याकडेही लोकांचे लक्ष आहे.
कर्जत/जामखेड
भाजपचा बालेकिल्ला अशीच या मतदारसंघाची स्थिती आहे. गेल्या सलग चार निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. गेल्या वेळीच हा मतदारसंघ खुला झाला, मात्र जागा काँग्रेसकडे असताना दोन्ही काँग्रेसचे चार जण रिंगणात उतरल्याने भाजपचे उमेदवार राम शिंदे यांना विजयासाठी फारसे कष्ट घ्यावे लागले नाही. महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांना मराठवाडय़ातील बीड जिल्ह्य़ातून येथे आणण्याची तयारी राष्ट्रवादीने चालवली आहे. तसे झाले तर, भाजपचा विजयाचा रौप्यमहोत्सव साजरा होऊ शकतो.
श्रीगोंदा
राष्ट्रवादीचे माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते हे आता येथून भाजपचे उमेदवार म्हणुन रिंगणात उतरणार आहेत. पाचपुते यांच्याशी दोन हात करताना विरोधकांचे मतैक्य घडवत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य तथा कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप या युवकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. येथून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे बंडखोरीच्या तयारीत आहेत. जेवढे जास्त उमेदवार तेवढी निवडणूक सोयीची, हे पाचपुते यांचे सूत्र आहे.
पारनेर
सलग दोन निवडणुका शिवसेनेकडे राहिलेला हा मतदारसंघ. मात्र तिसऱ्यांदा कोणाला निवडून द्यायचे नाही, ही परंपरा सन ५२ पासूनच्या निवडणुकांमध्ये या मतदारसंघाने गेल्या वेळपर्यंत पाळली आहे. जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असला तरी, तो काँग्रेसला सोडून द्याच्या विचारात पवार काका-पुतणे आहेत.शिवसेनेची उमेदवारी आमदार विजय औटी यांनाच तिसऱ्यांदा ही उमेदवारी मिळेल.