काँग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपाचा घोळ सुरू असतानाच काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघांतील अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांच्या आमदारांना आपल्या कळपात आणून राष्ट्रवादीने काँग्रेसच्या वाटय़ाचे मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याची पद्धतशीरपणे खेळी सुरू केली आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या ताब्यातील आठ मतदारसंघांतील आमदारांना प्रवेश देण्यात आला असून, आणखी दोन-तीन आमदार वाटेवर आहेत.
मालेगाव बाह्य मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे आमदार मुफ्ती मोहमद इस्माईल यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेल्या सोमवारी नऊ अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आतापर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या आठ आमदारांचे मतदारसंघ गेल्या वेळी काँग्रेसच्या ताब्यात होते. विद्यमान आमदार प्रवेश करेल त्या आमदारासाठी पुढील निवडणुकीत मतदारसंघ सोडावा, असे यापूर्वीच आघाडीत ठरल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. म्हणजेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या आठही आमदारांच्या मतदारसंघांवर राष्ट्रवादीने आधीच दावा केला आहे.  काँग्रेस-राष्ट्रवादीत नवापूर मतदारसंघावर वादावादी होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील समाजवादी पार्टीचे विद्यमान आमदार शरद गावित यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेल्या वेळी माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आपल्या भावाला सपाच्या वतीने निवडून आणले होते. नवापूर मतदारसंघांबाबत समझोता होऊच शकत नाही, असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्पष्ट केले.
आमदारांचे तळ्यात-मळ्यात
अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे निरोप देण्यात आले. लक्ष्मण जगताप (चिंचवड) आणि विलास लांडे (भोसरी) हे दोन अपक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पण ते शेवटपर्यंत पक्षाच्या कार्यालयात फिरकलेच नाहीत. त्यामुळे कार्यालयात उपस्थित असूनही अजितदादांनीही पत्रकार परिषद टाळली.