सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवून राष्ट्रवादीने नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत. राज्यातील भाजप नेत्यांचा या समीकरणाला विरोध असला तरी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी हा प्रस्ताव फेटाळलेला नसल्याने नवी समीकरणे असित्वात येतात का, याची चर्चा सुरू झाली.
कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने दोन पक्षांना एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापणे शक्य होणार नाही. ही संधी साधत सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला स्थैर्य आणि विकासाच्या मुद्दय़ावर बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दर्शविली. हा पाठिंबा बिनशर्त असेल तसेच सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असेही पटेल यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या या पवित्र्याने राज्यातील भाजपचे नेते मात्र सावध झाले. प्रचारात ज्या पक्षाला लक्ष्य केले त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसायचे, असा प्रश्न भाजप नेत्यांपुढे आहे.
राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. हा प्रस्ताव अमान्य आहे किंवा स्वीकारता येणार नाही, अशी भूमिका भाजपचे अध्यक्ष शहा यांनी पत्रकार परिषदेत मांडली नाही.  
सरकार स्थापण्यासाठी मदतीचा हात पुढे केल्यास शिवसेना अटी लादणार याची भाजपच्या नेतृत्वाला कल्पना आहे. यामुळेच राष्ट्रवादीच्या प्रस्तावाबाबत मौन बाळगून भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी शिवसेनेला बरोबर यायचे असल्यास अटी मान्य करणार नाही, हा सूचक संदेश दिला आहे.  
राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांची उद्या दुपारी दोन वाजता पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडीबरोबरच पाठिंब्याच्या पत्रासाठी आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जाण्याची शक्यता आहे.