कोकणातील कणकवली मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार विजय सावंत यांच्याऐवजी उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांना उमेदवारी देण्याची शिफारस राज्य संसदीय मंडळाने रविवारी केली. राष्ट्रवादीच्या ताब्यातील मतदारसंघांतील काँग्रेस पक्षाचे इच्छुक आणि त्यांचे समर्थक मुलाखतींच्या दरम्यान आक्रमक झाले होते आणि त्यांनी घोषणाबाजी करीत हे मतदारसंघ पक्षाकडेच राहिले पाहिजेत, असा आग्रह धरला होता.
राज्य संसदीय मंडळाने मुंबई आणि कोकणातील उमेदवारांच्या नावांची शिफारस करताना कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्या एकमेव नावाची शिफारस केली. या मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार विजय सावंत यांनीही उमेदवारी मागितली होती. कोकणात राणे आणि विजय सावंत यांच्यातील वाद सर्वानाच परिचित आहे. त्यातच साखर कारखान्याच्या उभारणीवरून उभयता परस्परांवर कुरघोडी करीत आहेत. राणे यांनी राजीनामा मागे घेताना नितेश यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे आश्वासन पक्षाकडून मिळविले होते. यानुसार संसदीय मंडळाने नितेश यांच्या एकमेव नावाची शिफारस केल्याने त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. स्वत: राणे कुडाळ मतदारसंघातून लढणार आहेत.
समर्थकांची घोषणाबाजी
राष्ट्रवादीने सर्व २८८ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याने आधी १७४ मतदारसंघांतील मुलाखती घेणाऱ्या काँग्रेसने उर्वरित ११४ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम पूर्ण केला. गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आलेल्या मतदारसंघांतील इच्छुकांनी टिळक भवन या पक्षाच्या मुख्यालयात जोरदार घोषणाबाजी केली. दगाबाज राष्ट्रवादीला बरोबर घेऊ नका, अशा घोषणा दिल्या गेल्या. अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांतीही स्वबळावर लढण्याची मागणी केली. अजितदादांचा पराभव निश्चित आहे, अशी ही मंडळी दावा करीत होती. राष्ट्रवादीचे नेते निवडणुकीच्या वेळी मतांसाठी काँग्रेसचा वापर करून घेतात, पण निवडून आल्यावर विरोधकांना बरोबर घेऊन काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना शत्रूसारखी वागणूक देतात, असाही तक्रारींचा सूर होता. मुंबईतील राष्ट्रवादीच्या मतदारसंघांतील इच्छुकांनी या जागा सोडणे म्हणजे विरोधकांच्या पारडय़ात जागा देण्यासारखे आहे, असे निदर्शनास आणून दिले. पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांनी राष्ट्रवादीला जागा सोडण्यास विरोध केला. काही इच्छुकांच्या समर्थकांनी फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.
१०० पेक्षा जास्त मतदारसंघांत एकाच नावाची शिफारस
राज्य संसदीय मंडळाने विद्यमान सर्व आमदारांच्या नावांची शिफारस फेरउमेदवारीकरिता केली आहे. आढावा घेण्यात आलेल्या १७४ पैकी १००पेक्षा जास्त मतदारसंघांत एकाच नावाची शिफारस करण्यात आल्याने त्यांची उमेदवारी पक्की मानली जाते. लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीकडून उद्या एकाच नावाची शिफारस करण्यात आलेल्या नावांवर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.
मुलाखती नव्हे चर्चा -ठाकरे
राष्ट्रवादीने सर्व २८८ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याने काँग्रेसनेही तयारी म्हणून सर्व जागांचा आढावा घेतला. गत वेळी वाटय़ाला आलेल्या १७४ मतदारसंघांतील इच्छुकांच्या आम्ही मुलाखती घेतल्या होत्या. राष्ट्रवादीकडे असलेल्या मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती नव्हे तर त्यांच्याशी मतदारसंघांतील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. सर्व मतदारसंघांतील इच्छुकांकडून माहिती घेतली याचा अर्थ आम्ही सर्व जागा लढणार असे नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.