मला मुख्यमंत्रिपदात रस नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वारंवार सांगत असले तरी ते या पदासाठी इच्छुक असून त्यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना उघड पािठबाही जाहीर केलेला नाही. दिल्लीतील काही नेत्यांच्या आशीर्वादामुळे व उद्योगपतींसह काहींच्या दबावामुळे गडकरी यांनी मुख्यमंत्री व्हावे, यासाठी भाजपमध्ये मोहीम सुरू झाली आहे. गडकरी यांचे उघड समर्थन करून व शक्तिप्रदर्शनातून पक्षनेतृत्वावर दबाव आणण्याचे राजकारणही सुरू झाले आहे. दरम्यान, पक्षनेतृत्वाने गडकरी यांचे मुख्यमंत्रिपदासाठी समर्थन करणाऱ्यांना कोणताही जाब विचारलेला नाही किंवा कारवाईचा इशारा दिलेला नाही, असे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
केंद्रीय मंत्रिपद सांभाळताना देशभरात मोठा अधिकार मिळतो, अनेक मुख्यमंत्री येतात. तरी केंद्रीय मंत्रिपद सांभाळतानाही पंतप्रधान हे सर्वोच्च असतात. त्या तुलनेत महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची जबाबदारी चांगली आहे व अधिकार मोठे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सूचनेनुसार महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले, तरी दैनंदिन कारभार सांभाळताना मुख्यमंत्र्यांना मुभा असणार आहे. त्यामुळे गडकरी हे सध्या द्विधा मन:स्थितीत असून राज्यातील आमदार व अन्य नेते त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह करीत आहेत. दरम्यान, गडकरी यांच्यासाठी शक्तिप्रदर्शन करणाऱ्या व त्यांना पािठबा देणाऱ्यांना भाजपने समज दिली असल्याची चर्चा होती. मात्र त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे माजी प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार यांनी सांगितले. गडकरी हे अनुभवी नेते असून त्यांनी राज्याचे नेतृत्व करावे, ही आमदारांची भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.