काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप महायुतीच्या विरोधात तिसरी शक्ती म्हणून महाआघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, जागावाटपावरून काही पक्षांचे सूर अजून बिनसलेलेच आहेत. तर आता अधिक प्रतीक्षा न करता रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान मोर्चा व डावी लोकशाही समितीच्या युतीची शुक्रवारी घोषणा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन-नवीन आघाडय़ा स्थापन झाल्या आहेत. शेकाप, माकप, भाकप, जनता दल, रिपब्लिकन पक्ष (सेक्युलर) यांची महाराष्ट्र डावी लोकशाही समिती स्थापन झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकशाही आघाडी आधीपासूनच अस्तित्वात आहे. त्यानंतर आता रिपब्लिकन सेना, सत्यशोधक ओबीसी परिषद, शिवराज्य पक्ष व अन्य काही लहान रिपब्लिकन गटांना सोबत घेऊन आनंदराज आंबेडकर यांनी संविधान मोर्चा नावाने आणखी एक आघाडी स्थापन केली
आहे.
संविधान मोर्चा व डावी आघाडी यांच्यात जवळपास समझोता झाला असून, शुक्रवारी त्यासंदर्भात घोषणा होणार आहे, अशी माहिती आनंदराज यांनी दिली.