महाराष्ट्रात आतापर्यंत कधीही झाला नव्हता, असा तमाशा गेले १०-१५ दिवस पाहत होतो. सारे योजनाबद्ध होते. शरद पवारांनी तर एका भाजप नेत्याला फोन करून चक्क सांगितले की, तुम्ही युती तोडल्यावर अध्र्या तासात आम्ही आघाडी तोडतो. सर्व काही ठरवून घडले. बाळासाहेब असते तर भाजपला कधीच लाथाडले असते, अशा शब्दांत युती-आघाडीवर तोंडसुख घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ रविवारी कांदिवली पूर्व येथे फोडला.
ठाकूर व्हिलेज येथे झालेल्या प्रचंड सभेत ठाकरे यांनी ठाणे महापौर निवडणुकीची आठवण उपस्थितांना करून दिली. त्यावेळी एक नगरसेवक फुटला होता. तेव्हा सर्व नगरसेवकांचे राजीनामे बाळासाहेबांनी घेतले होते आणि चार वर्षांच्या सत्तेवर पाणी सोडले होते, याकडे राज यांनी लक्ष वेधले.
 मित्र पक्षाने गद्दारी केल्यानंतरही शिवसेनने केंद्रातील मंत्रीपद कायम ठेवले. महापालिकेतील युतीही तोडायला हवी होती. परंतु आयता उत्पन्नाचा स्रोत हातचा जाईल, अशी भीती बाळगणाऱ्या शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा. आज तुम्ही दुभंगलेले आहात म्हणून तुम्हाला गरज आहे. पण असला भंपकपणा, ढोंग कशाला करता, असा सवालही ठाकरे यांनी केला.
भाजपचा खरपूस समाचार घेताना राज ठाकरे म्हणाले की, भाजप हा विश्वास ठेवण्यालायक पक्ष नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे अतुल भातखळकर तसेच नगरचे आमदार सदाशिव लोखंडे मनसेत उमेदवारीसाठी आले तेव्हा आपण स्वत: नितीन गडकरी यांना फोन करून जागरूक केले होते. आज माझा आमदार पळवताना लाज नाही वाटत का, असा सवालही गडकरींचे नाव न घेता केला. युती-आघाडीने महाराष्ट्रातील राजकारणाचा पुरता विचका केला आहे, याचा मला राग आहे. तुम्हाला गृहित धरले जात आहे. १९९९ मध्ये विदेशीचा मुद्दा उपस्थित करीत वेगळी चूल मांडणाऱ्या पवारांनी नंतर युती केली, याची आठवण करून देत ठाकरे यांनी, कोणाला आलेल्या झटक्याने महाराष्ट्राचे धोरण ठरू शकत नाही, असे ठामपणे सांगितले. कुणालाही बहुमत न मिळाल्यास महाराष्ट्र पुन्हा १५ वर्षे मागे जाणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर स्वाभिमानाच्या गोष्टी केल्या जात आहेत. एकदा माझ्या हातात सत्ता द्या. मग स्वाभिमान काय असतो ते मी दाखविन, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
मी महाराष्ट्र हिताचा विचार घेऊन पुढे जात आहे. भविष्यातील महाराष्ट्राचा विचार करून विकास आराखडा मांडला आहे. ते माझे वचन आहे. माझा शब्द आहे. एकदा माझ्या बाजुने कौल द्या. आजपर्यंत जे पाहिले नाही ते करून दाखविन. पैसे कमावणे, ही माझी गरज नाही. मालमत्ता गोळा करणे हा माझा छंद नाही. ब्ल्यु प्रिंटवर सात वर्षे घालविली आहेत. आता ते शक्य करून दाखवायचे आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
रतन खत्रीचे राज्य नव्हे ना?
युती -आघाडीबाबत गेले १०-१५ दिवस सुरू असलेल्या घोळाचा उल्लेख करून राज ठाकरे यांनी, राज्यात मटकाकिंग रतन खत्रीचे राज्य सुरू तर नाही ना, असा आकडय़ांचा खेळ सुरू असल्याचा टोला हाणला.
झोपडपट्टीमुक्त शहर
*सुरक्षा रक्षक एजन्सी बंद करून माझे सरकार स्वत:ची सुरक्षा रक्षक एजन्सी सुरू करील. माझी मराठी मुले हातात शस्र घेऊन पोलिसांच्या मदतीने उभी राहतील.
*लाखो तरुणांना रोजगार मिळेल. माझे सरकार येईल तेव्हा नव्या झोपडय़ांचा शेवटचा दिवस असेल.
*माझे सरकार स्वत: झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवेल
*महिलेचा नावावर घर केले तर सर्व कर माफ.
*परवडणारी घरे, खड्डे विरहीत रस्ते.
आठवले उपमुख्यमंत्री..
रिपाई नेते रामदास आठवले यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याची खिल्ली उडवत राज ठाकरे म्हणाले की, हे ऐकून आठवलेंची घरची मंडळीही हसली असतील. आठवले हे स्वत:च कोसळले असतील. ऑफर देताना विचार तरी करायचा. पंखा विकता आहात का, असा सवालही राज यांनी कोणाचेही नाव न घेता केला.