राज्यात सरकार स्थापनेसाठी सज्ज झालेल्या भाजपकडून मंत्रिपदे मिळणार की नाही, याबद्दल काहीच खात्री नसताना रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर आमच्या एका मंत्र्याचा शपथविधी झाला पाहिजे, अशी जाहीर मागणी केली. त्याचवेळी पक्षात डझनभर नेत्यांमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून ३१ ऑक्टोबरला शपथविधी होईल. भाजपची सरकार स्थापन्यासाठी लगबग सुरु असताना निवडणूकपूर्व युती केलेले घटक पक्षाचे नेते मात्र सत्तेत सहभाग मिळणार की नाही, याबद्दल अस्वस्थ झाले आहेत. या संदर्भात बुधवारी आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी आठवले यांनी ही मागणी केली. त्यानंतर मंत्रिपदासाठी आपणच कसे योग्य आहोत हे सांगण्याची रिपाइं नेत्यांची चढाओढ सुरु झाली.
बैठकीला अविनाश महातेकर, सुमंतराव गायकवाड, गौतम सोनावणे, भूपेश थुलकर, तानसेन ननावरे, सुरेश बारसिंग, पी.के जैन, उत्तम खोब्रागडे आदी नेते बैठकीला उपस्थित होते. त्यापैंकी बहुतेकांनी आपल्याला मंत्रिपद मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली. घटक पक्षांना सत्तेत सहभागी करुन घेण्याबाबत भाजपने अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे या पक्षांच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.