काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी बुधवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षातील भोंगळ कारभाराला कंटाळल्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवरही त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. रणजित देशमुख यांनी काँग्रेस सत्तेत असताना, राज्यमंत्री, मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून प्रकृती साथ देत नसल्यामुळे देशमुख पक्षात अधूनमधून सक्रिय होतानाच दिसत होते. रणजित देशमुख यांनी आतापर्यंत तीनदा काँग्रेसचा त्याग केला आहे. गेल्याच वर्षी ते स्वगृही परतले होते. मात्र, देशमुखांच्या दोन्ही मुलांनी इतर पक्षांची कास धरल्यामुळे काँग्रेस पक्षातही त्यांच्याविरूद्ध नाराजी होती.
देशमुखांचा थोरला मुलगा डॉ. आशिष या वेळी भाजपकडून काटोल मतदारसंघातून रिंगणात आहे. डॉ. आशिष गेल्या पाच वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी सावनेर मतदारसंघातून काँग्रेसच्या सुनील केदारांविरुद्ध निवडणूक लढवली. त्यात थोडय़ा मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
रणजित देशमुखांचे दुसरे पुत्र अमोल यांनी या वेळी रामटेकमधून काँग्रेसची उमेदवारी मागितली होती. स्वत: रणजित देशमुखांनी अमोलसाठी पक्षश्रेष्ठींकडे शब्द टाकला होता. मात्र, पक्षाने त्यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारली. काँग्रेसने रामटेकमधून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे अमोल देशमुखांनी राष्ट्रवादीचे घडय़ाळ हातावर बांधले.