महाराष्ट्रात पहिल्यावहिल्या भाजप सरकारची विधिवत स्थापना  शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवरील आलिशान शामियानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. अशा रीतीने केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबपर्यंत जाहीर केलेल्या जागतिक काटकसर पंधरवडय़ाचा शुभारंभ मोदी यांच्याच  उपस्थितीत कोटय़वधी रुपयांच्या उधळपट्टीने होणार आहे.
महाष्ट्रात प्रथमच भाजपचे सरकार सत्तेवर आल्याने भाजपजन अत्यानंदात न्हाऊन निघाले असून सत्ताग्रहणाचा हा आनंद सोहळा राजभवनावर न करता क्रिकेटच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या वानखेडे स्टेडियमवर साजरा करण्याचे ठरले. राज्य कर्जात बुडविले, दिवाळखोरीत काढले असे तत्कालीन आघाडी सरकारवर आरोप करणाऱ्या भाजपने आता त्यांच्या सरकारच्या स्थापनेसाठी शपथविधी सोहळ्यावर कोटय़ावधी रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे.
योगायोग असा की, केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर असा देशभर जागतिक काटकसर पंदरवडा पाळण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रीय बचत संस्था या प्रसंगी काटकसरीचा संदेश तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी आणि लघु बचतदार बनून राष्ट्रउभारणीसाठी कटिबद्ध राहण्याचा वादा करु या, असे काटकसर पंधरवडय़ाचे ब्रिद आहे. या निमित्ताने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली व अर्थ राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी समाजातील सर्व घटकांना जीवनात काटकसरीचे तत्त्व अवलंबण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी तर काटकसर भारतीयांच्या जनुकातच आहे म्हणूनच सारे जग आर्थिक मंदीने हेलकावे खात असताना भारत स्थिर होता, असा अभिनान आपल्या संदेशात व्यक्त केला आहे.  देशाला काटकसरीचा संदेश देणाऱ्या पंतप्रधानांच्या उपस्थितीतच शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर हा  शाही शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधी सोहळा होतो, त्याचा मंडप, व्यासपीठ, आसनव्यस्था, इत्यादींवर साधारणत: १० ते १५ लाख रुपये खर्च होतो, असा अंदाज आहे. त्या तुलनेत वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या कार्यक्रमावर सरकारी तिजोरीतून काही कोटी रुपये खर्च होणार आहेत.