विवेकानंद आंतरराष्ट्रीय फाऊंडेशन या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थेचे पदाधिकारी व माजी केंद्रीय गृहसचिव अनिल बैजल यांची राज्यपालांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने निवडणूक निकालापर्यंत राज्याची सारी सूत्रे राज्यपालांच्या हाती राहणार आहेत. दैनंदिन कारभार बघण्याकरिता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी माजी केंद्रीय गृहसचिव बैजल यांची सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. २००४मध्ये भाजपचे सरकार असताना बैजल यांची गृहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. यूपीएचे सरकार सत्तेत येताच त्यांची गृहसचिवपदावरून बदली करण्यात आली होती. केंद्रात भाजपची सत्ता येताच पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी निवड झालेले नृपेंद्र मिश्रा तसेच अतिरिक्त सचिव पी. के. मिश्रा तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजय देओल हे सारेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विवेकानंद आंतरराष्ट्रीय फाऊंडेशन संस्थेशी संबंधित आहेत. राज्यपालांच्या सल्लागारपदी नियुक्ती झालेले बैजल हे सुद्धा या संस्थेशी संबंधित असून ते या संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. राज्यपालांनी संघाशी संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्याला नेमून महाराष्ट्रातही भाजपच्या कलाने कारभार चालणार हे जवळपास अधोरेखितच केले आहे.