विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि आघाडी यांच्यात जागावाटपावरून घोडे अडले असताना महायुतीत प्रवेशासाठी सत्ताधारी आघाडीतील नेत्यांचा ओघ सुरूच असून सोमवारी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे संजय सावकारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबई येथे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. कधीकाळी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले सावकारे हे मागील निवडणुकीत विजयी झाल्यानंतर कालांतराने चौधरी आणि त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळेच चौधरी यांनी विधानसभा निवडणुकीत सावकारे यांचा पराभव करण्याची जाहीर घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती.
या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीने सावकारे यांचे समर्थक युवराज लोणारी यांची भुसावळ शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून चौधरी यांना बळ दिले होते. यामुळे संतप्त सावकारे समर्थकांनी आपापल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले होते. तेव्हांपासून सावकारे हे राष्ट्रवादीत नाराज होते.
विशेष म्हणजे जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे जळगाव पालिका घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे कारागृहात आहेत. त्यातच आता सावकारे यांनी भाजप प्रवेश केल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव जिल्ह्य़ात राष्ट्रवादीला नेतृत्वच उरलेले नाही. सावकारे यांचे बंधू प्रमोद सावकारे व बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील यांनीही सोमवारी भुसावळ येथे भाजपमध्ये प्रवेश केला.