भाजप आणि शिवसेनेत ताणले गेले असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बेबनाव कायम आहे. राष्ट्रवादीने १२४ जागांचा प्रस्ताव फेटाळला असला तरी काँग्रेसने अद्याप राष्ट्रवादीला काहीही प्रतिसाद दिलेला नाही. महायुतीतील घडामोडींकडे आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले असून, आघाडीचे भवितव्य महायुतीच्या निर्णयावर ठरणार आहे.
‘काँग्रेसने १२४ जागांचा प्रस्ताव सादर केला होता. पण हा प्रस्ताव राष्ट्रवादीने फेटाळला आहे. राष्ट्रवादीने सोमवार सकाळपर्यंतची काँग्रेसला मुदत दिली होती. पण काँग्रेसकडून कोणताही नवा प्रस्ताव आलेला नाही, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. आघाडी कायम राहावी ही आमची इच्छा आहे.पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची उद्या बैठक बोलाविली असून, त्यात पुढील निर्णय घेतला जाईल, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीची भूमिका आम्हाला प्रसार माध्यमांतूनच समजली. राष्ट्रवादीने आमच्या प्रस्तावाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. आघाडीत कोंडी फोडण्याकरिता काँग्रेस आणि राष्ट्रवादीत प्रयत्न सुरू होते. काही पातळीवर चर्चा सुरू होती. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली. आघाडी कायम राहावी म्हणून चर्चा सुरू असून, काहीतरी तोडगा निघेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता उद्या नवी दिल्लीत बैठक होत आहे. या वेळी राष्ट्रवादीचा जागांचा प्रस्ताव, किती जागा सोडता येतील याबाबत चर्चा करण्यात येईल.
महायुतीकडे लक्ष
महायुतीत भाजप आणि शिवसेनेत सध्या बिनसले आहे. दोन्ही बाजूने कठोर भूमिका घेतली आहे. महायुतीत फाटाफूट झाल्यास आघाडीत कायम राहू नये, असा राष्ट्रवादीत मतप्रवाह आहे. यामुळेच महायुतीचा विषय संपेपर्यंत आघाडीच्या चर्चेचा घोळ सुरू राहिल अशीच एकूण चिन्हे आहेत. राष्ट्रवादीला १२८ पेक्षा जास्त जागा देण्याची काँग्रेसची तयारी नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी १३६ पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास तयार नाही. यातूनच हा घोळ सुरू आहे. राष्ट्रवादीने मध्यमार्ग काढावा म्हणून काँग्रेसच्या वतीने विनंती करण्यात आली.