शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांना आव्हान देत कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणारे शिवसेनेचे बंडखोर नेते अनंत तरे यांचा अर्ज सोमवारी बाद ठरला. हा अर्ज बाद ठरण्यापूर्वीच तरे यांनी थेट ‘मातोश्री’शी संधान बांधत विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न सुरु केले होते. त्यामुळे आपल्याच पक्षाचे माजी शहराध्यक्ष संदीप लेले यांना बाजूला सारत तरे यांच्यासाठी लाल गालिचा अंथरणाऱ्या भाजप नेत्यांची नाचक्की झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.  
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी अनंत तरे प्रयत्नशील होते. मात्र, सुरुवातीपासूनच ‘मातोश्री’वरुन त्यांचे नाव मागे पडल्याचे वृत्त होते. जुन्या बेलापूर मतदारसंघातून पालकमंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात दहा वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव तरे यांच्यापुढे ठेवण्यात आला होता. नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला उमेदवार मिळत नव्हता. तेव्हाही तरे यांचे नाव पुढे आले होते. मात्र, दोन्ही वेळेस तरे फारसे सकारात्मक दिसले नाहीत, अशी चर्चा होती. याच मुद्दयावरुन ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या यादीत तरे यांचे नाव पिछाडीवर होते.
अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघातून त्यांचा पत्ता कापण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या तरे यांनी कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करुन बंडाचा भगवा खांद्यावर घेतला. एकनाथ शिंदे यांनाच आपण आव्हान देत असल्याचे चित्र तरे यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र २४ तासातच बंडाचा फुगा फुटला.
अर्जासोबत तरे यांनी पक्षाच्या एबी फॉर्मची मुळ प्रत जोडण्याऐवजी त्याची फोटो कॉपी जोडली होती. त्यामुळे त्यांचा अर्ज छाननी दरम्यान बाद ठरविण्यात आला. त्यापूर्वीच तरे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी समेटाची चर्चा सुरु केली होती. सोमवारी सकाळी अर्ज बाद होताच त्यांनी मातोश्रीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेत बंडाचे शस्त्र म्यान केले. तरे यांच्या या ‘बंड’लबाजीमुळे भाजपची मात्र नाचक्की झाली असून कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून संदीप लेले हे पक्षाचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी विधान परिषदेवर पाठविण्याचे आश्वासन दिल्याचे तरे यांनी सांगितले. अर्जाचा घोळ निवडणूक अधिकाऱ्यांमुळे झाल्याने त्याविरोधात आयोगाकडे दाद मागण्याचा इशाराही तरे यांनी दिला.

वसईत विवेक पंडितांना पाठिंबा
मुंबई : चांदिवलीमध्ये एक जागा गमावल्यावर भाजपने वसईमध्ये विवेक पंडित या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवीत असलेले अपक्ष उमेदवार हितेंद्र ठाकूर आणि विवेक पंडित यांच्यामध्ये लढत होईल. भाजपने या मतदारसंघात शेखर धुरी यांना उमेदवारी दिली होती. पण विवेक पंडित यांनी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी विचारविनिमय करुन पंडित यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे धुरी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील.