‘पवार काका-पुतण्याच्या गुलामगिरीतून बारामतीची सुटका करा’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्येच केलेल्या आवाहनानंतरही, राज्यात स्थैर्य आणि विकासाच्या मुद्दय़ावर सरकार स्थापण्यासाठी स्वत:हून भाजपला पाठिंबा देण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शविल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटली असतानाच, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे संयुक्त सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या एका नेत्याने संपर्क साधला होता, असा दावा करीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आणखी संभ्रम वाढविला. काँग्रेसने मात्र लगेचच पवार यांचा दावा खोडून काढला. सरकार स्थापण्याचा घोळ सुरू असताना पवार यांनी वेगळेच पिल्लू सोडल्याचे मानले जाते.
शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीने सरकार स्थापण्यासाठी बाहेरून पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव आला असला तरी काँग्रेसने जेव्हा केव्हा बाहेरून पाठिंबा दिला ते सरकार फार काळ टिकले नव्हते. हा अनुभव लक्षात घेता हा प्रस्ताव व्यवहार्य ठरू शकत नाही, असे मत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले. काँग्रेसच्या एका राज्यस्तरीय नेत्याने हा प्रस्ताव मांडला होता, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. पवार काका-पुतण्याने हा दावा केला असला तरी पक्षाच्या वतीने तसा कोणताही प्रस्ताव मांडण्यात आला नव्हता, असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते संदीप दीक्षित यांनी स्पष्ट केले.
..म्हणूनच पाठिंबा
भाजपला स्वत:हून पाठिंबा देण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर टीका होऊ लागली असली तरी पवार यांनी त्याचे समर्थन केले. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. अशा वेळी सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला कोणत्या तरी पक्षाने पाठिंबा दिल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही. पण स्थैर्य आणि विकासाच्या मुद्दय़ावरच आम्ही विधायक पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे, असे पवार यांनी सांगितले. १४४चा जादुई आकडा गाठणे कोणाला शक्य न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट कायम राहू शकते. कालांतराने पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागेल. हे टाळण्याकरिताच सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविण्यात आली. केंद्रातील विचाराचे सरकार राज्यात असल्यास त्याचा फायदा होतो हे लक्षात घेऊनच आम्ही हा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले.
केंद्राचे शेतकरी विरोधी धोरण
एकीकडे भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयाचे समर्थन करतानाच पवार दुसरीकडे केंद्राच्या कृषी धोरणावर टीका केली. राष्ट्रवादीचा पाया हा ग्रामीण भागात आहे. केंद्रातील भाजप सरकारने कांदा-बटाटा मोठय़ा प्रमाणावर आयात केला. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. केंद्राच्या या धोरणाच्या विरोधात पक्षाने आक्रमक व्हावे, असा सल्लाही पवार यांनी दिला.