शासकीय यंत्रणा मोडीत काढण्याचे काम करीत शरद पवार यांनी भ्रष्टाचाराला शिष्टाचार बनविले. पवारांमुळे महाराष्ट्राची केवळ पीछेहाटच झाली नाही तर मान शरमेने खाली गेली, असा थेट आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी केला. कोण आमदार होईल आणि कोण मुख्यमंत्री होईल यामध्ये गुंतून न राहता देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचाही विकास करण्यासाठी भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यास कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असेही शहा यांनी सांगितले.
भाजप पश्चिम महाराष्ट्राच्या विजय संकल्प मेळाव्यात अमित शहा बोलत होते. शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम, माजी आमदार अभिराम सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कांबळे आणि वसंत वाणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय चिटणीस श्याम जाजू, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, युवा मोर्चा अध्यक्षा पंकजा मुंडे-पालवे, शहराध्यक्ष खासदार अनिल शिरोळे, आदी. या वेळी व्यासपीठावर होते.
महाराष्ट्राचे योगदान असल्याखेरीज देशाचा विकास होऊ शकत नाही. यशवंतरावांच्या कालखंडात महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर होता. मात्र, त्याच महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने-बँका बंद पडल्या आणि घोटाळे वाढले. पायाभूत सुविधांमध्ये पीछेहाट झाली. भ्रष्टाचाराला शिष्टाचार करण्याचे काम शरद पवारांनी केले. भाजपचे सरकार असलेल्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ राज्यांमध्ये २४ तास वीज आहे. तर, महाराष्ट्रात भारनियमन आहे. हे अंतर समाप्त करण्यासाठी भाजपला विजयी करावे, असे आवाहन अमित शहा यांनी केले.
देशाचे पंतप्रधान १० वर्षे मूक होते. मात्र, सामान्य माणसाच्या मनातले बोलणारा पंतप्रधान जनता गेले १०० दिवस पाहते आहे. जन धन योजना सुरू करून ६५ टक्के जनतेचे ‘झिरो बॅलन्स अकाऊंट’ काढले गेले. आतापर्यंत चार कोटी खाती सुरू करीत गरिबांना देशाच्या अर्थनीतीमध्ये सहभागी करून घेतले. युपीए सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम ‘पोटा’ कायदा रद्द केला गेला. तर, मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर काळा पैसा देशामध्ये आणण्यासाठी विशेष कृती दलाची (एसआयटी) स्थापना करण्याचा निर्णय झाला, असे शहा म्हणाले.
लक्ष्मीदर्शन करून शेवटच्या महिन्यांत सह्य़ा झालेल्या सर्व फायलींचा आढावा आपले सरकार आल्यावर घेतला जाईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तर, ११ लाख ८८ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या आघाडी सरकारमधील मंत्र्यांना तुरुंगात जावे लागेल, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
पंकजा मुंडे, खासदार अनिल शिरोळे यांचीही भाषणे झाली.
तर सगळे भ्रष्ट मंत्री तुरुंगात..
कोल्हापूर : देशात राजकारणाचे व्यापारीकरण करण्याचा उद्योग शरद पवार यांनी केला आहे. राज्यातील भ्रष्ट आघाडी शासनाच्या कारभाराचा वस्तुनिष्ठ तपास झाला तर एकही मंत्री तुरूंगापासून वाचू शकणार नाही, अशा शब्दांत  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी विरोधकांवर हल्ला चढविला. तत्त्वाला तिलांजली देऊन राजकारण करणारी ही प्रवृत्ती उखडून टाकून सिध्दांतावर राजकारण करणाऱ्या भाजपाकडे राज्याची सत्ता सोपवावी, असे आवाहनही त्यांनी केले.  
‘जनतेचा राग समजून घ्या’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात टाळ्या वाजवून भाषण बंद पाडण्यामध्ये भाजपचे षडयंत्र असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. त्याचा समाचार घेत अमित शहा म्हणाले, १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीने लुटण्याचे काम केले. जनता नाराज आहे म्हणूनच टाळ्या वाजवून राग व्यक्त झाला. भाजपसाठी गादी खाली करायची हेच जणू जनतेने दाखवून दिले तरी त्यांना समजत नाही. दरम्यान, पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्ष यात्रेचा समारोप पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे आज झाला, मात्र यातून व येथूनच आता भारतीय जनता पक्षाची सत्तापरिवर्तन यात्रा सुरू झाली आहे, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी चौंडी येथे केले. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेडराजा येथून सुरू झालेल्या पंकजा यांच्या ‘पुन्हा संघर्ष यात्रे’चा समोराप शहा यांच्या उपस्थितीत झाला. देश काँग्रेसमुक्त करावयाचा असून त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून करत आहोत, त्याला पाठबळ मिळू दे, असे आवाहन शहा यांनी केले.