पनवेल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची उमेदवारी पदरात पडण्यापूर्वी विरोधकांनी प्रशांत ठाकूर यांना कोंडीत पकडण्यासाठी कॅगचा आधार घेतला, प्रशांत ठाकूर कुटुंबीयांचा घोटाळे करणारे कंत्राटदार असा चेहरा दाखविण्याचा प्रयत्न शेकापने सुरू केला आहे. शेकापने आज पत्रकार परिषद घेऊन नियंत्रण व महालेखापरीक्षक समितीचा अहवाल (कॅग) माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उलवे येथील क्रीडासंकुलाचा आणि कळंबोली येथील वाहनतळाच्या (बीओटी तत्त्वांवर) कारभारामध्ये घोटाळा झाल्याची कागदपत्रे पत्रकारांना दिली. पनवेलमधून शेकापचे बाळाराम पाटील हे निवडणूक लढवत आहेत.उलवा येथे आरटीएसव्हीएम क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या क्रीडासंकुलाला भेट दिली होती. हे क्रीडा संकुल ६.७ हेक्टर जागेवर आहे. संबंधित जागा मिळविण्यासाठी २००९ मध्ये मुख्यमंत्र्यांनी सिडकोला निर्देश दिल्यावर ही जागा क्रीडासंकुलाला मिळाल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट म्हटले आहे. सिडकोने या जागेची निविदा काढताना अल्प प्रतिसाद मिळूनही पुनर्निविदा प्िरक्रया का केली नाही, असे ताशेरे सिडकोवर ओढले आहेत. व्यवहारातील गैरनियमनामुळे सिडकोचा पंधरा कोटी रुपयांपेक्षा अधिकच महसूल बुडाला आहे. मुळात ही जागा सामुदायिक गृहयोजना, समुचर शाळा क्रीडांगण आणि सार्वजनिक वाहनतळ यासाठी आरक्षित होती. हे आरक्षण बदलण्यात आले. त्यानंतर ठाकूर यांनी येथे क्रीडासंकुल उभारले आहे.कळंबोली येथे बीओटी तत्त्वावर वाहनतळउभारणी आणि देखभालीच्या मुद्दय़ावर सिडकोचा गैरकारभार नडला असल्याचे कॅगने म्हटले आहे. हे काम टीआयपीएल कंपनीला देण्यात आले होते. टीआयपीएलच्या अगोदर या वाहनतळाची दुर्दशा असूनही २५ लाख रुपयांचा महसूल प्रतिवर्ष सिडकोला मिळत होता. सिडकोने हे वाहनतळ २० वर्षांसाठी टीआयपीएल कंपनीला दिले आहे. यामधून टीआयपीएल कंपनी सिडकोला प्रतिवर्ष ५ लाख रुपये देणार आहे. त्यामुळे सिडकोला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला असे कॅगने नोंदविले आहे. ही सर्व माहिती आमदार विवेक पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली. निवडणूक तोंडावर आल्यामुळे मतदारांची दिशाभूल करण्यासाठी ही कॅगची कागदपत्रे दाखवून आम्हाला बदनाम करण्याचा डाव शेकापकडून होत आहे. आम्ही कंत्राटे मिळविताना निविदा प्रक्रियेत भाग घेऊन ही कामे मिळविली आहेत. क्रीडा संकुलाच्या वेळी बोली पद्धतीच्या निविदेनंतर हा व्यवहार झालेला आहे. -माजी खासदार रामशेठ ठाकूर